सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ क मधून एआयएमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार पटेल मौलाली फिरदोस यांनी उमेदवारी अर्ज भरताना गंभीर माहिती लपविल्याचा आरोप करत प्रभाग १६ ची निवडणूक स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार व व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता सैफन अमिनसाब शेख यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की,संबंधित उमेदवारावर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत सत्र न्यायालयात गंभीर गुन्हा प्रलंबित असताना उमेदवारी अर्जातील संबंधित रकान्यात ‘निरंक’ अशी खोटी माहिती देण्यात आली आहे. हा प्रकार लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५-अ चे उल्लंघन असून मतदारांची,विशेषतः दलित व मागासवर्गीय मतदारांची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खोटे एफिडेव्हिट सादर केल्याप्रकरणी संबंधित उमेदवारावर भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी,तसेच निपक्ष निवडणुकीस बाधा निर्माण झाल्याने प्रभाग क्रमांक १६ मधील सध्या सुरू असलेली निवडणूक स्थगित करून स्वतंत्ररित्या घेण्यात यावी,अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीसोबत पुरावेही जोडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
