कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने केले तडकाफडकी निलंबित
कर्नाटक : कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी (नागरी हक्क अंमलबजावणी) के.रामचंद्र राव यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे. कार्यालयातील एका महिलेसोबतचा त्यांचा कथित 'अश्लील व्हिडिओ' सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे कर्नाटकच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय आहे? सोमवारी (१९ जानेवारी) के. रामचंद्र राव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ते एका महिलेसोबत त्यांच्या कार्यालयात आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलत, "सरकारी सेवकाला न शोभणारे वर्तन" आणि "सरकारची प्रतिमा मलीन करणे" या कारणास्तव त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले असून, "कायदा सर्वांसाठी समान आहे,मग अधिकारी कितीही मोठा असो," असे स्पष्ट केले आहे.
सावत्र मुलीच्या अटकेमुळे आधीच चर्चेत विशेष म्हणजे, रामचंद्र राव हे यापूर्वी त्यांची सावत्र मुलगी आणि कन्नड अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिच्यामुळे चर्चेत आले होते. मार्च २०२५ मध्ये रान्या रावला बेंगळुरू विमानतळावर १४.८ किलो सोने (किंमत सुमारे १२.५६ कोटी रुपये) तस्करी करताना अटक करण्यात आली होती. रान्या सध्या बेंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) असून तिला ‘कोफेपोसा’ (COFEPOSA) कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलीच्या अटकेनंतर रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.
राव यांचे स्पष्टीकरण निलंबनाच्या कारवाईनंतर रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडिओ "बनावट" (Fabricated) असून आपल्याला बदनाम करण्यासाठी आणि आपले करिअर संपवण्यासाठी रचलेला हा कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ कदाचित ८ वर्षांपूर्वीचा बेळगावमधील असू शकतो किंवा 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला असू शकतो,असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या या प्रकरणाची सीआयडी (CID) आणि सायबर विभागामार्फत चौकशी सुरू असून,व्हिडिओची सत्यता पडताळली जात आहे.
