सोलापूर : महापालिका सभागृहात गटनेता निवडण्यासाठी महापालिका नगरसचिव यांनी सर्व पक्षांध्यक्षांसह एमआयएमचे शौकत पठाण यांना पत्र पाठवले. मात्र निवडून आलेल्या आठ नगरसेवकांनी याला विरोध करीत पठाण हे अध्यक्ष नसून आम्हीच जबाबदार आहोत,असे सांगितले. तो पत्र घेतला आणि त्या मागे सर्वांनी स्वाक्षरी घेतली. यावरून पक्षाचे आठ नगरसेवक आले मात्र नेतृत्वावरून प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात असल्याचे दिसत आहे.
ऐन महापालिका निवडणुकीसमोर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रभारी अन्वर सादाद यांनी सुत्रे हातात घेतली. निवडणुका पार पडल्या आणि पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले. महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवड होणार आहे.
या निवडीच्यावेळी आपापल्या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये गटनेता असणे महत्वाचे आहे. त्यानुसार अगोदर गटनेता निश्चित होईल. त्यानुसार महापालिकेने सर्व पक्षाच्या अध्यक्षाना पत्र पाठवून गटनेत्याचे नाव कळवण्याचे सांगितले.
महापालिकेने एमआयमचे शौकत पठाण यांना पत्र पाठवले. हे कळताच एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी महानगरपालिकेत मानधनावर असलेले नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांची गुरुवारी भेट घेतली. शौकत पठाण हे आमचे अध्यक्ष नाहीत. आम्ही जबाबदार नगरसेवक आहोत,असे सांगून त्यांनी ते पत्र घेतले आणि आठ नगरसेवकांनी त्या पत्रावर स्वाक्षरी केली. यावर पक्ष काय निर्णय घेईल,नेतृत्वाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
