Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामीन मंजूर!


अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून सशर्त जामीन मंजूर!

सोलापूर :  अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली जेल रोड पोलीस ठाण्यात दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी गु.र. क्र.०४३६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) आणि ६९ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (सुधारणा २०१५) चे कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(va) आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ चे कलम ४ आणि ६ प्रमाणे आरोपी शुभम प्रशांत मुळे (रा.रविवार पेठ,जुना बोरामणी नाका,सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.




फिर्यादीने आपल्या जबाबात असे नमूद केले होते की, आरोपी शुभम मुळे याची ओळख इंस्टाग्रामद्वारे झाली असून त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आरोपी पुणे येथे डिलीव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून सुट्टीच्या काळात सोलापूर येथे येत असे. दिनांक १४ जून २०२५ रोजी आरोपीने फिर्यादीस आपल्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी फिर्यादीस अस्वस्थ वाटू लागल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती दीड महिन्याची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.



तद्नंतर आरोपी शुभम मुळे याने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, वरील प्रकरणात तपास पूर्ण झाला असून,पुढील पुराव्यांवर तो परिणाम करणार नाही तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल. आरोपीविरुद्ध कोणताही पूर्वइतिहास नाही. त्यास दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल,म्हणून जामीन मंजूर व्हावा अशी आरोपीतर्फे बाजू मांडली होती.




दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांनी दि-१५ ऑक्टोबर २०२५ रोजी अटकेतील आरोपी शुभम प्रशांत मुळे यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सदर प्रकरणात - आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड. ओंकार फडतरे,ॲड. मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ, ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अभिषेक नागटिळक,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.अजय वाघमारे,ॲड. शिवानी पवार आणि ॲड.सलामत पटेल यांनी तर सरकारतर्फे ॲड.कुलकर्णी यांनी काम पाहिले .