Ticker

6/recent/ticker-posts

पिस्टल व काडतूस बाळगल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर !

देशी बनावटीचे पिस्टल व काडतूस बाळगल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस सोलापूर न्यायालयातून सशर्त जामीन मंजूर!

सोलापूर : सोलापूर ते विजापूर महामार्गावर,नांदणी टोल नाक्याजवळील हॉटेल शरण बसवेश्वरच्या पुढे बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्टल (गावठी) आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याच्या गंभीर आरोपाखाली मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद (वय: ४६, रा.जवाहर नगर,शेळगी, सोलापूर) याच्याविरुद्ध दि. १९/११/२०२५ रोजी गु.र.क्र. ०३९९/२०२५ अन्वये शस्त्र अधिनियम,१९५९ चे कलम ३ आणि २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.


गुन्ह्याची हकीकत अशी,स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-विजापूर महामार्गावर हॉटेल शरण बसवेश्वरजवळ आरोपी हुसेन बाशा सय्यद हा देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगून उभा असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला दि. १९/११/२०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पकडले. पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या उजव्या बाजूच्या कमरेला काळया रंगाचे धातुचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व पॅन्टच्या चोर खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपीने सदर शस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. सदर शस्त्र आणि मोटारसायकल (क्र. MH 13 V 1758) असा एकूण रु. ३५,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तद्नंतर आरोपी हुसेन बाशा सय्यद तर्फे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,सोलापूर यांच्या न्यायालयात रिमांडमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. 



सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून,पुढील पुराव्यांवर आरोपी कोणताही परिणाम करणार नाही. तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल. त्यास दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल,म्हणून जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली.



दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर,माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,एस.पी.शिलवंत यांनी दि. २५/११/२०२५ रोजी आरोपी हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.




वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मनिष बाबरे,ॲड.अभिषेक नागटिळक,ॲड.अजय वाघमारे आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.