Ticker

6/recent/ticker-posts

विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु...

सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु

सोलापूर : सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ,यांनी आयुक्त सचिन ओंबसे,पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरण व संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित केली होती. बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विमानतळ परिसर लगत राहणाऱ्या सर्व नागरिक, व्यापारी,दवाखाने,मांसाहारी पदार्थ विक्रेते तसेच गॅरेज व्यावसायिक यांना सूचनापत्राद्वारे महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



या सूचनापत्रासह सदर भागातील रहिवासी व व्यापारी अतिक्रमणधारक यांचा सर्वे हा वीणा पवार अतिरिक्त आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे सुरू करण्यात आला आहे .

सोलापूर विमानतळाच्या कंपाऊंडवाल लगतच्या भागामध्ये काही नागरिक व व्यापारी यांच्याकडून वारंवार कचरा थेट विमानतळाच्या परिसरात टाकण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या कचऱ्यातील खाद्यपदार्थांच्या वासामुळे पाळीव व भटके प्राणी,पक्षी,घारी मोठ्या प्रमाणात त्या भागाकडे आकर्षित होत असून त्यामुळे विमानतळ परिसराच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे महानगरपालिकेच्या निरीक्षणात आले आहे. तसेच परिसरातील गॅरेजधारकांकडून टायर जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर व प्रदूषण यामुळे वातावरण दूषित होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

त्याचप्रमाणे विमानतळाच्या लगतच्या परिसरात काही ठिकाणी नागरिकांकडून गच्चीवरून,शौचालयाच्या भिंतीवरून अथवा उंचावरून पतंग उडविण्याचे प्रकारही दिसून आले असून यामुळे विमान सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अनधिकृत बांधकामे,पत्रा शेड,शौचालये व अतिक्रमणाची प्रकरणे देखील समोर आली आहेत.




या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी त्या ठिकाणा वरिल सर्व रहिवासी व व्यापाऱ्यांनी आपला कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा. विमानतळाच्या कंपाऊंडच्या आत किंवा परिसरात कचरा फेकू नये.मटन, चिकन, मच्छी आदी मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांनी कचरा उघड्यावर फेकता कामा नये. गॅरेज व्यावसायिकांनी टायर,रबर वा अन्य वस्तू जाळून धूर निर्माण करू नये.विमानतळ परिसरातील कोणत्याही घरातून पतंग उडवू नये. विमानतळ कंपाऊंड लगत कोणतेही अनधिकृत बांधकाम,पत्रा शेड,शौचालय उभारू नये; विद्यमान बांधकामे तात्काळ काढून घ्यावीत. कोणतेही अतिक्रमण,शेड,टपऱ्या इ.तात्काळ हटविण्यात याव्यात.विमानतळ कंपाऊंड लगत कोणतेही वाहन,ट्रक इत्यादी उभे करू नये. परिसरातील सर्व दवाखाने यांनी आपला बायोमेडिकल वेस्ट योग्य पद्धतीने नष्ट करावा; तो उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई केली जाईल.



महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की,वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी,गॅरेज व मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करून विमानतळ परिसराची स्वच्छता व सुरक्षितता अबाधित ठेवावी,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केलं आहे.