सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश! जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचचा मोर्च्यात सहभाग
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या असंवैधानिक अन्याय्य घटनांच्या विरोधात आणि आफताब शेख प्रकरणी न्याय व शांततेसाठी सर्वधर्मीय मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,ओरोस (सिंधुदुर्ग) येथे सोमवार दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील 'आम्ही भारतीय' या पुरोगामी गटाने आयोजित केलेल्या या मोर्च्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते. हा मोर्चा पूर्णतः शांततामय,संविधानसम्मत आणि अहिंसात्मक पद्धतीने पार पडला.
अलीकडेच बांदा येथील तरुण आफताब कमरुद्दीन शेख याने झालेल्या अन्यायामुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे अल्पसंख्यांक समुदायासह सर्व संवेदनशील नागरिकांच्या मनात दु:ख,वेदनेची भावना आहे तसेच न्यायाची तीव्र अपेक्षा आहे. आणि म्हणूनच अन्यायग्रस्तांसाठी न्याय मिळवणे,समाजात शांती, बंधुभाव आणि एकात्मता टिकवणे, आणि संविधानातील मूल्यांचा सन्मान राखणे या उद्देशाने हा मोर्चा आयोजित केला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजावर कट्टर हिंदुत्ववाद्याकडून विविध प्रकारचा अन्याय होतो आहे, हे आम्हाला आम्ही भारतीय म्हणून मान्य नाही. आम्ही या अन्यायाचा निषेध करतो. आफताब प्रकरणात आम्ही भारतीय नागरिक कमी पडलो आणि म्हणून त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. त्याबद्दल आम्ही त्याच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागतो अशी भावना जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांनी मोर्च्याला संबोधित करताना व्यक्त केली.
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचने मोर्च्यात सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजावरिल वाढत्या अन्यायांच्या घटना व बांदा येथील व्यवसाय न करू दिल्यामुळे झालेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदभाव मंचची चौकशी समिती सावंतवाडी येथे आली होती. या समितीतील सदस्यही या मोर्च्यात सामील झाले. महाराष्ट्रभरात दलित व अल्पसंख्यांक समाजावरिल अत्याचारांच्या घटनांची समन्वयक इब्राहिम खान यांनी माहिती दिली व आपण सर्वांनी एकत्र राहून या घटना घडू नयेत म्हणून प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी मोर्च्याला उद्देशून केले. या घटना थांबल्या नाहीत तर या या विषयावर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
आम्ही या धडक मोर्च्यात कुठल्याही धर्माचे नाही तर भारतीय म्हणून सामिल झालो आहोत अशा भावना एजाज नाईक व सहकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सामाजिक सलोखा नष्ट करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत अशी भावना मोर्चेकरी व्यक्त करत होते.
