ऑपरेशन लोटस भाजप कार्यकर्त्यांनाच झोंबतय
स्थानिक नेत्यांचा भाजपा शहर अध्यक्षकां समोर गोंधळ
तडीपार गुंडांना भाजपात प्रवेश देताय का? स्थानिक नेत्यांनी शहर अध्यक्षकांना विचारला जाब
शहर अध्यक्ष म्हणाल्या मी चौकशी करते आणि प्रदेशाध्यक्षकांकडे तुमचं गाऱ्हाणं मांडते
सोलापूर : सोलापूर शहरातील भाजप कार्यालयात सोमवारी पुन्हा एकदा गोंधळ सदृश परिस्थिती पहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चे नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते. दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आंदोलन केले अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. दक्षिण सोलापूरच्या विरोधा नंतर आता उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात येऊन भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना घेराव घातला. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात आम्ही भाजपसाठी आयुष्य दिलं,आमची घर दार विकली आणि आता भाजप प्रदेश पातळीवर तडीपार गुंडांना,आमच्या विरोधात भाजपात पक्ष प्रवेश देत आहे. शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची समजूत घातली. यावेळी शहर अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांत किरकोळ शाब्दीक चकमक झाली.
भाजप कार्यकर्त्यांचा संताप - स्थानिक स्वराज्य निवडणूकां समोर आल्याने सोलापुरात भाजप प्रवेश मोठ्या संख्येने होत आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने मोठा लोंढा भाजपात येत आहे. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ५ मध्ये काही कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वर्षा बंगल्यावर जाऊन ज्या स्थानिक नेत्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला ते याअगोदर लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काम केलेले आहेत. आरएसएसच्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण करून जखमी केले होते. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भाजपात आणून आमच्या छातीवर कशाला बसवत आहात असा संताप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या समोर व्यक्त केला. माध्यमांना समोर बोलताना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत विरोध व्यक्त केला आहे.
