Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची क्रीडा क्षेत्रात गरुडझेप; २८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

कोंडी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत मिळवले यश;संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार

सोलापूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल आणि विजयसिंह मोहिते-पाटील ज्युनिअर कॉलेज, कोंडी येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे ४० विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे कोंडी गावासह संस्थेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत भर पडली आहे.

क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी लक्ष्य करिअर अकॅडमी, अकोलेकाटी येथे तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यांनी धावणे, अडथळा शर्यत, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, हातोडाफेक आणि रिले अशा विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.



१७ वर्षे वयोगटात विविध क्रीडा प्रकारांत यश
१७ वर्षे वयोगटात अथर्व संतोष गायकवाड याने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. युद्धजित भोसले याने ११० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम, तर कार्तिक नागनाथ दळवे याने थाळीफेक आणि भालाफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला.

श्रावणी राहुल वाघचवरे हिने हातोडाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. श्रीनिवास तानाजी राठोड याने भालाफेकमध्ये प्रथम आणि ३००० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला. अथर्व रोहित चौगुले याने ११० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला.



संध्या ज्योतीराम रणदिवे हिने थाळीफेकमध्ये,तर सफा एजाज शेख हिने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. वैभवी कुंभार हिने हातोडाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. शंभुराजे नागेश जाधव याने भालाफेकमध्ये द्वितीय आणि १९ वर्षे वयोगटातील १०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला.

मुलींच्या ४×१०० मीटर रिले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघात प्राजक्ता निंबाळकर,समृद्धी मुटकुळे,श्रेया सुतार, प्रणिता भोसले आणि श्रेया माने यांचा समावेश होता.

१९ वर्षे वयोगटातही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
१९ वर्षे वयोगटात करण टोणपे याने ५००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. प्रवीण देवीदास जाधव याने ११० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम आणि हातोडाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथमेश गणपाटील याने गोळाफेकमध्ये, तर ऋतिक रमेश भोसले याने हातोडाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

प्रणिता तुकाराम भोसले हिने थाळीफेकमध्ये प्रथम आणि गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. आकांक्षा अनिल शिंदे हिने गोळाफेकमध्ये प्रथम आणि थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. अनुजा बिबीशान साठे हिने हातोडाफेकमध्ये,तर प्राजक्ता रमेश निंबाळकर हिने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

राजवीर विठ्ठल भोसले याने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. समृद्धी समाधान मुटकुळे हिने भालाफेकमध्ये प्रथम आणि हातोडाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. दिव्या दत्तात्रय गुंड हिने १०० मीटर धावण्यात द्वितीय आणि १०० मीटर अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवला.

ऋतुजा तानाजी दळवे हिने हातोडाफेकमध्ये द्वितीय क्रमांक, वैभव कुमार पवार याने ३००० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक,अथर्व खांडेकर याने ११० मीटर अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक,तर गुरुराज किसन भोसले याने भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

मुलांच्या ४×१०० मीटर रिले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघात अथर्व गायकवाड,अथर्व चौगुले,यश गुंड,राहुल राठोड आणि विश्वजीत भोसले यांचा समावेश होता.


क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य सिद्ध केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांच्या हस्ते सर्व यशस्वी खेळाडू आणि क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले, “ग्रामीण भागात सुविधा कमी असतानाही आमच्या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोंडी गावाचे व संस्थेचे नाव रोशन केले आहे. येणाऱ्या काळात आमचे विद्यार्थी नक्कीच राज्यस्तरापर्यंत पोहोचतील.”

प्रा.एन.के.भोसले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती,शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होतो,असे मत व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी,असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास प्राचार्य सुषमा नीळ,मुख्याध्यापिका अर्चना औरादे, विकास जाधव,रवी कुतकुंडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून आगामी स्पर्धेतही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून,त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.