पैशाचा गैरव्यवहार व लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
सोलापूर : आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन,सोलापूर येथे गु.र.क्र. ५००/२०२६ अंतर्गत आरोपी आझम उर्फ सलमान अ. रहेमान सातखेड, वय २९ वर्षे, रा.शोभा देवी नगर,नई जिंदगी, सोलापूर याच्याविरुद्ध दिनांक २२ मे २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ६४, ६४(२)(म), ६९, ११५(२) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच्या जबाबानुसार,फिर्यादीची आरोपीसोबत सन २०१८ मध्ये ओळख झाली होती. आरोपी रिक्षा चालवत असल्याने फिर्यादीला तिच्या दुकानात ये-जा करण्यासाठी तो रिक्षाने सोडत असल्याने दोघांची ओळख वाढली व त्यानंतर त्यांच्यात मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. आरोपीने फिर्यादीशी लग्न करण्याचे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तसेच त्यानंतरही लग्नाचे आश्वासन देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीने पुढे नमूद केल्याप्रमाणे,ती तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीसोबत काही काळ एकत्र राहत होती. आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याकडून वेळोवेळी कामानिमित्त पैसे घेतल्याचा तसेच आरोपी व त्याच्या आईने मिळून अंदाजे १२ लाख रुपये घेतल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. त्यानंतर आरोपी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला व दिनांक १० एप्रिल २०२६ पासून त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याच्याशी संपर्क झाला नसल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. आरोपीने दुसरे लग्न केल्याची माहिती त्याच्या मित्राकडून मिळाल्याचेही फिर्यादीने आपल्या जबाबात नमूद केले आहे.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी यांनी असा युक्तिवाद केला की,आरोपीस दिनांक ०३ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली असून,सदर प्रकरणातील तपास पूर्ण झालेला आहे व आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आरोपीची पुढील कोठडी आवश्यक नाही. तसेच खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला.
आरोपीतर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादाचा तसेच प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.बी.भस्मे यांनी आरोपी आझम उर्फ सलमान अ.रहेमान सातखेड यास सदर प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ,ॲड. भाग्यश्री जगदाळे,ॲड. पैगंबर सय्यद,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार व ॲड. प्रदिप गायकवाड यांनी काम पाहिले.
