सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या शरद विठ्ठल कोळी, रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर याच्यावर M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी स्थानबद्धतेचा आदेश जारी केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येरवडा कारागृहात जमा केले, अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये दिली आहे.
शरद कोळी याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी यांसह विविध गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे गुन्हे पंढरपूर तालुका, सांगोला, कामती, मंगळवेढा आणि मंद्रुप पोलीस ठाण्यांसह सोलापूर जिल्ह्याबाहेरील नांदेड व जळगाव जिल्ह्यांतही दाखल असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही शरद कोळी याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्ये केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
M.P.D.A. प्रस्ताव सादर - शरद कोळी याच्या कथित वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांनी पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे M.P.D.A. कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन यांनी शरद कोळी यास M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
सांगली जिल्ह्यातून ताब्यात- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने शरद कोळी याचा शोध घेत त्याला सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा
सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गुन्हे करणारे तसेच वाळू तस्करी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून,अशा गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही M.P.D.A. कायद्यान्वये प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल वि.कुलकर्णी यांनी दिला आहे.
सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी-अंमलदारांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मात्र आता प्रश्न जनतेचा...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर झालेली ही M.P.D.A. अंतर्गत कारवाई केवळ गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कारवाई आहे की त्यांचा हा राजकीय बळी आहे?
या कारवाईकडे आपण कसे पाहता?
कृपया आपली प्रतिक्रिया द्या.
