Ticker

6/recent/ticker-posts

दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड; चार आरोपी ताब्यात...


पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून ६ लाख ८० हजारांची लूट; १४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला मोदी बोगदा,स्मशानभूमीजवळ बोलावून घेतल्यानंतर पोलिस असल्याची बतावणी करत मारहाण करून ६ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन जाणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्याचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने तात्काळ छडा लावला. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांच्याकडून कार, मोटारसायकल, पाच मोबाईल फोन आणि ५ लाख ५० हजार रुपये रोख,असा एकूण १४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादीला २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोदी बोगदा, स्मशानभूमीजवळील सार्वजनिक रस्त्यावर बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर तेथे आलेल्या अन्य तीन साथीदारांनी आपण पोलीस असल्याचे सांगून फिर्यादीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील ६ लाख ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१०(२), २०४, २०५, ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



गुन्ह्याचा तपास करून आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना दिल्या होत्या. त्यानुसार २८ सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार हाजीमलंग शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वांगी रोड, सोलापूर येथील मोकळ्या मैदानात एक स्विफ्ट कार व दुचाकीसह काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची माहिती मिळाली.


या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने कारवाई करत संतोष राजाप्पा पाटील (वय ४४), महिबूब युसूफ विजापूरे,मल्लिकार्जुन यल्लप्पा शिवळ्ळी (वय ४२) आणि मंजुनाथ कल्याणराव निडोदे (वय ३५) या चार जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपींनी सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून १ स्विफ्ट कार, १ मोटारसायकल, ५ मोबाईल फोन आणि ५ लाख ५० हजार रुपये रोख,असा एकूण १४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम.राज कुमार,पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख,अनिल जाधव,रामेश्वर साखरे,कल्लप्पा देखाणे,अभिजित पवार,निलोफर तांबोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे मच्छिंद्र राठोड,चालक सतीश काटे आणि बाळासाहेब काळे यांनी सहभाग घेतला.