आकाश दळवी यांचे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे निवेदन; पूर्वीच्या तक्रारींवर Action Taken Report देण्याची मागणी
बार्श : श्री. खंडेश्वर देवस्थान,खांडवी येथील देवस्थान व्यवस्थापन, विश्वस्त/व्यवस्थापन समितीची रचना, देवस्थानच्या मालमत्ता व इनाम जमिनी तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी खांडवी येथील रहिवासी आकाश पांडुरंग दळवी यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवस्थानच्या व्यवस्थापनात संबंधित ग्रामस्थ व भाविकांना विश्वासात घेतले जात नसल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली असून, देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण आणि व्यवस्थापनात पारदर्शकता राहावी, हा आपला उद्देश असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
दळवी यांच्या म्हणण्यानुसार,त्यांनी यापूर्वीही खंडेश्वर देवस्थानच्या विविध बाबींविषयी धर्मादाय विभागाकडे तक्रारी, निवेदने व पाठपुरावा अर्ज साद केले आहेत. मात्र, त्यावर अपेक्षित स्वरूपाची ठोस व अंतिम कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्वीच्या सर्व तक्रारींची एकत्रित नोंद करून त्यावर आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विश्वस्त समितीच्या नियुक्तीची कागदपत्रे तपासण्याची मागणी
सध्याच्या विश्वस्त/व्यवस्थापन समितीची नियुक्ती कोणत्या आदेशानुसार झाली, प्रत्येक सदस्याची नियुक्ती कोणत्या प्रक्रियेतून झाली,तसेच समितीच्या व्यवस्थापनात ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागासंदर्भातील नियम,ट्रस्ट डीड,योजना व आदेश यांची तपासणी करण्यात यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच देवस्थानच्या मालकीच्या किंवा व्यवस्थापनाखालील सर्व जमीन व मालमत्तेची यादी तयार करून महसूल व धर्मादाय अभिलेखांशी पडताळणी करावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.
इनाम जमिनींच्या अभिलेखांची पडताळणी करण्याची मागणी देवस्थानच्या जमिनींपैकी कोणती जमीन इनाम स्वरूपाची आहे, तिचे मूळ स्वरूप काय आहे, याची सक्षम महसूल अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासाठी ७/१२ उतारे,फेरफार नोंदी,इनाम नोंदी,सनद,जुने हक्क अभिलेख तसेच शासन व महसूल विभागाचे आदेश तपासण्यात यावेत. देवस्थानच्या जमिनीबाबत पूर्वी फेरफार, हस्तांतरण, वापरबदल किंवा अन्य नोंदी झाल्या असल्यास त्यांची कायदेशीर वैधताही तपासावी,अशी मागणी निवेदनात आहे.
देवस्थानच्या मालमत्ता व निधीचा वापर नियमानुसार होत आहे किंवा नाही,याबाबत आवश्यक धर्मादाय चौकशी करण्यात यावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.
शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी
निवेदनात २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या महसूल विभागाच्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. तसेच देवस्थान इनाम जमिनींबाबत प्रारूप अधिनियम तयार करण्यासाठी गठित शासनस्तरीय समितीच्या पार्श्वभूमीवर खंडेश्वर देवस्थानच्या इनाम जमिनीशी संबंधित बाबींचा स्वतंत्र अहवाल तयार करून सक्षम महसूल प्राधिकरणाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आवश्यक असल्यास हे प्रकरण संबंधित शासनस्तरीय समितीच्या निदर्शनास आणून द्यावे,अशी मागणीही करण्यात आली आहे.
२ ऑक्टोबरला शांततामय उपोषणाचा इशारा
पूर्वीच्या तक्रारींवर अपेक्षित कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी श्री. खंडेश्वर देवस्थान,खांडवी येथे शांततामय उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देवस्थानच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन करण्याचाही निर्णय घेतल्याचे आकाश दळवी यांनी म्हटले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय राहील आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध द्वेष, धमकी किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने पूर्वीच्या तक्रारींवर कायदेशीर व पारदर्शक कार्यवाही केल्यास आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय त्यानुसार घेण्यात येईल,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती धर्मादाय आयुक्त,जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी बार्शी,तहसीलदार बार्शी,सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक,संबंधित पोलीस ठाणे,महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच खंडेश्वर देवस्थानच्या संबंधित विश्वस्त/व्यवस्थापन मंडळाला देण्यात आल्या आहेत.
