Ticker

6/recent/ticker-posts

शनिवारपासून कचरा संकलन बंद; नागरिकांच्या घरासमोर कचऱ्याचे ढीग, आरोग्य धोक्यात!


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित परिसरात मागील शनिवारपासून घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये कचरा साचला असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या परिसरातील घरांवर सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन अथवा मालमत्ता ओळखीसाठी वापरला जाणारा QR कोड असलेला फलक लावण्यात आलेला आहे. या फलकावर ओला व सुका कचरा याबाबतची चिन्हे तसेच विशिष्ट नोंदणी क्रमांक असल्याचे दिसून येते. त्यामुळे QR कोडच्या माध्यमातून कचरा संकलन व्यवस्थेचे नियोजन व नोंद ठेवली जात असेल,तर प्रत्यक्षात घराघरातून कचरा संकलन का होत नाही,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


कचरा संकलनाची जबाबदारी कोणाची?
नियमित कचरा संकलनाची व्यवस्था असतानाही सलग काही दिवस कर्मचारी परिसरात न आल्यास नागरिकांना कचरा घरात किंवा परिसरात साठवून ठेवण्याची वेळ येते. कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी,माशा-मच्छरांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे याकडे केवळ स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब म्हणून पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - कचरा संकलनाचे काम नियमितपणे होत असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असेल,मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या घरातून कचरा उचलला जात नसेल,तर संबंधित कंत्राटदार,कर्मचारी अथवा जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच केवळ प्रसिद्धी किंवा कागदोपत्री काम दाखविण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन प्रत्यक्ष कचरा संकलन सुरळीत करावे,अशी मागणीही या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महापालिका प्रशासन या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कचरा संकलन पूर्ववत करणार का आणि संबंधितांवर काय कारवाई करणार,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.