भारत नगर परिसरात पोलिसांची कारवाई; दोन आरोपींना अटक, २५ हजारांचा मोबाईलही जप्त
सोलापूर : सोलापूर शहरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात शहर गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. भारत नगर, कुमठा नाका परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ९६.९१ किलो गांजा, किंमत ४८ लाख ४५ हजार ५०० रुपये, जप्त केला आहे. या प्रकरणी मुजमिल अल्ताफ शेख (वय २०) आणि निलोफर इरफान शेख (वय ३९) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सोलापूर शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई - सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालून अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवत होते.
दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथक भारत नगर क्रीडा संकुलाच्या भिंतीजवळील परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार भारत पाटील यांना एका घराबाहेर बसलेला संशयित इसम प्लास्टिकच्या पिशवीत काही संशयास्पद वस्तू विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले.
संशयिताच्या पिशवीत गांजा आढळला - पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचे नाव मुजमिल अल्ताफ शेख (वय २०), रा. घर क्रमांक ४००, भारत नगर, क्रीडा संकुलाजवळ, कुमठा नाका, सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याकडील प्लास्टिकच्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. नियमानुसार झडती घेतल्यानंतर काळसर हिरवट रंगाचा, उग्र वास असलेला, बिया व बोंडांसह ओलसर गांजा मिळून आला.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित गांजा घरातही असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घराची झडती घेतली.
घरातून गांजाची ४८ पाकिटे जप्त - घरझडतीदरम्यान निलोफर इरफान शेख (वय ३९) ही महिला आढळून आली. घरामध्ये प्लास्टिक टेपने गुंडाळलेली गांजाची एकूण ४८ पाकिटे पोलिसांना मिळाली. त्यानंतर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले.
फॉरेन्सिक पथकाने केलेल्या तपासणीत जप्त करण्यात आलेला काळसर हिरवट रंगाचा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. सर्व गांजाचे वजन केले असता ते ९६.९१ किलोग्रॅम असल्याचे आढळले. त्याची किंमत ४८ लाख ४५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; अटक - या कारवाईत पोलिसांनी ९६.९१ किलो गांजासह २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ४८ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब), २(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुजमिल अल्ताफ शेख आणि निलोफर इरफान शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव करीत आहेत. गांजाचा पुरवठा कुठून झाला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी - ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक शबनम शेख, सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्यासह पोलीस अंमलदार भारत पाटील,शैलेश बुगड, अभिजीत धायगुडे, राजकुमार वाघमारे, काशीनाथ वाघे, महिला पोलीस हवालदार निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, विजयकुमार वाळके, संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, सुभाष मुंढे, रामा भिंगारे, अजय गुंड, अजिंक्य माने, चालक श्याम सुरवसे आणि बाळासाहेब काळे यांनी सहभाग घेतला.
सोलापूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात गुन्हे शाखेने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
