Ticker

6/recent/ticker-posts

दक्षता जनजागृती सप्ताह; भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन


सोलापूर जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह; भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन; लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन

सोलापूर : भ्रष्टाचाराचे निर्मूलन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर घटकाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह २०२६ साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीय व निमशासकीय कार्यालये,शैक्षणिक संस्था,महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात व्याख्याने, कार्यशाळा आणि विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच समाजमाध्यमे,व्हॉट्सॲप संदेश आणि ई-मेलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.


या उपक्रमांतर्गत नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य,लाचेची मागणी झाल्यास तक्रार करण्याची प्रक्रिया आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी जागरूक राहून प्रामाणिक व पारदर्शक प्रशासनाच्या निर्मितीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लाच मागितल्यास तक्रार करा!
शासकीय कामकाजासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी. भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.



नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती द्यायची असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरोधात तक्रार करायची असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

टोल फ्री हेल्पलाइन : १०६४.
सोलापूर कार्यालय दूरध्वनी : ०२०-२६१२२१३४.
सोलापूर कार्यालय व्हॉट्सॲप : ९४०४००१०६४.
पुणे परिक्षेत्र व्हॉट्सॲप : ९४०३७८१०६४.
मुख्यालय, मुंबई व्हॉट्सॲप : ९९३०९९७७००.
ई-मेल : dyspacbsolapur@mahapolice.gov.in

दक्षता जनजागृती सप्ताहातील कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे,असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.