Ticker

6/recent/ticker-posts

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ६२.७६ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ८५.८६ टक्के मतदान!


पुणे विभागातील पाच जिल्ह्यांचा अंतिम मतदान अहवाल जाहीर; शिक्षक मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानाचा अंतिम अहवाल जाहीर झाला असून, पदवीधर मतदारसंघात एकूण ६२.७६ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ८५.८६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघांत पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

मतदानाची प्रक्रिया सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडली.


पदवीधर मतदारसंघात २ लाख ४३ हजार ५२१ मतदारांनी बजावला हक्क - पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या अंतिम अहवालानुसार, पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांची नोंद होती. त्यापैकी २ लाख ४३ हजार ५२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख ६८ हजार ५५६ पुरुष, ७४ हजार ९६३ महिला आणि २ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ६२.७६ इतकी नोंदविण्यात आली.

जिल्हानिहाय विचार करता, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४३ टक्के मतदान झाले. सातारा जिल्ह्यात ६६.९४ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ६३.८३ टक्के, पुणे जिल्ह्यात ६१.४७ टक्के, तर सांगली जिल्ह्यात ५५.५१ टक्के मतदानाची नोंद झाली.



शिक्षक मतदारसंघात ८५.८६ टक्के मतदान - पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत अधिक मतदान झाले. या मतदारसंघात एकूण ६१ हजार ९४० मतदारांची नोंद होती. त्यापैकी ५३ हजार १८४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ३३ हजार २१६ पुरुष, १९ हजार ९६५ महिला आणि ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ८५.८६ इतकी आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या जिल्हानिहाय मतदानात सोलापूर जिल्हा ८९ टक्के मतदानासह आघाडीवर राहिला. सातारा जिल्ह्यात ८९.३९ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ८८.६२ टक्के, सांगली जिल्ह्यात ८७.८३ टक्के, तर पुणे जिल्ह्यात ७८.०८ टक्के मतदान झाले.



निवडणूक प्रशासनाकडून अंतिम अहवाल जाहीर - पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मान्यतेने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठबिरे यांनी दोन्ही मतदारसंघांचे अंतिम मतदान अहवाल प्रसिद्ध केले आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या आकडेवारीवरून शिक्षक मतदारसंघात तुलनेने अधिक मतदान झाल्याचे स्पष्ट होते. आता या निवडणुकीच्या निकालाकडे उमेदवारांसह राजकीय पक्षांचे आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.