सोलापूर : ज्यूडिशियल एम्प्लॉईज प्रीमियर लीग, ऑक्शनवाइज २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश अजितकुमार भस्मे होते.
या उद्घाटन सोहळ्यास सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार देशपांडे,न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दीपक कणखरे,दिवाणी न्यायाधीश निखिल मोर तसेच पद्मजा मोटर्सचे सीईओ सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आठ संघमालक,न्यायालयीन कर्मचारी खेळाडू आणि मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी प्रेक्षक उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून,तब्बल १२० खेळाडू आपले क्रिकेट कौशल्य दाखवणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख २१ हजार रुपये आणि चषक, तर उपविजेत्या संघाला रोख १५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडाभावना,संघभावना आणि परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २४ ऑक्टोबर तसेच १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वल्याळ मैदान येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ॲड. महादेव विनायक गोटे यांनी दिली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पवन गायकवाड, अहमद शेख,डी.ए.लिंबोळे,नबीलाल शेख,शाम राजे पांढरे, प्रसाद चुंगे आणि इक्बाल पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
सोलापूरच्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या या क्रिकेट स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
