Ticker

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीत MD ड्रग्जसह आरोपी अटकेत; राजणीमध्ये गांजा जप्त


सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! 

25 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त; अंमली पदार्थांविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांची विशेष मोहीम

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत मोठी कारवाई केली आहे. टेंभुर्णी येथे मेफेड्रोन (MD) विक्रीसाठी आणल्याच्या संशयावरून एका आरोपीला अटक करण्यात आली असून,पंढरपूर तालुक्यातील राजणी गावात गांजाही जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 25 लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.



टेंभुर्णीत MD ड्रग्जसह आरोपी जेरबंद - दिनांक 21 ते 22 ऑक्टोबर 2026 दरम्यान राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली. टेंभुर्णी शहरातील कुर्डुवाडी ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवरून एका कारमधून मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला. संशयित कार घटनास्थळी येताच पोलिसांनी कारवाई करून गौतम अजित भोसले (वय 38,रा.वेणेगाव,ता.माढा,जि.सोलापूर) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 5.52 ग्रॅम मेफेड्रोन (MD), किया सेल्टोस कार, दोन मोबाईल,वजनकाटा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एकूण 21 लाख 61 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 788/2026 नुसार एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 8(क) आणि 22(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे करीत आहेत.



राजणी गावात गांजाची लागवड आणि साठ्यावर कारवाई - दुसऱ्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील राजणी गावाच्या परिसरात गांजा बाळगल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

राजणी येथील पंकेश मोहन दांडगे यांच्या घराशेजारील शेतात तपासणी केली असता, कापून भारे बांधून ठेवलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाचे वजन 5 किलो 620 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 3 लाख 81 हजार रुपये आहे. या प्रकरणातील पुढील कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.


2026 मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत 91 गुन्हे दाखल - सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण 91 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 25 गुन्ह्यांमध्ये अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 66 गुन्हे अंमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, 2026 मध्ये गांजा, MD आणि इतर मुद्देमालासह कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची अवैध विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती - अंमली पदार्थांचे सेवन हे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून कायदेशीर कारवाईसोबतच शाळा,महाविद्यालये आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध विक्री,तस्करी किंवा संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे,सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस.यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, टेंभुर्णी पोलीस ठाणे आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.