Ticker

6/recent/ticker-posts

कोयत्याने मानेसह डोक्यावर गंभीर वार करून खुनाचा प्रयत्न; अटकेतील आरोपीला सोलापूर न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर!


सोलापूर : खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने कोयत्याने तरुणाच्या मानेवर व डोक्यावर गंभीर वार केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी सतीश हनुमंत थोरात (रा. माळकवठा, ता. दक्षिण सोलापूर, मंद्रूप) यांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांनी हा जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

बहिणीचे स्टेटस ठेवण्यावरून वाद - या प्रकरणातील फिर्यादीला आरोपी व त्याच्या साथीदारांनी देवदर्शनासाठी सोबत नेले होते. देवदर्शन करून परत येत असताना फिर्यादीला माळकवठा येथील शेतातील वस्तीवर नेण्यात आले. तेथे आरोपी व साथीदारांनी फिर्यादीला, 'तू माझ्या बहिणीचे स्टेटस का ठेवतोस आणि तिला त्रास का देतोस?' असा जाब विचारत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याच वादातून आरोपी सतीश थोरात यांनी फिर्यादीच्या डाव्या मानेवर कोयत्याने वार केला. तसेच डोक्यावरही तीन ते चार वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.



बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल - या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला बेशुद्धावस्थेत सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १२७(२), १४०(३), ३५१(२), ३५१, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी सतीश हनुमंत थोरात यांना अटक केली होती. अटकेनंतर आरोपीने जामिनासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.



बचाव पक्षाच्या वकिलांनी केली बाजू मांडणी - सदर जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांनी आरोपी सतीश हनुमंत थोरात यांना सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.कदीर औटी,ॲड.वैभव बौंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ, ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनीष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड. पैगंबर शेख,ॲड.सलामत पटेल,ॲड.प्रदीप गायकवाड,ॲड. संकेत पवार आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.

या प्रकरणातील जामीन मंजुरीमुळे न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले असून,पुढील तपास आणि खटल्यातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.