सोलापूर : मोहोळ शहरातील समर्थ नगर परिसरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना २८ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. या घटनेत दोन घरांतील एकूण १ लाख ७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या चोरीमध्ये फिर्यादी किशोर वासुदेव दाते यांच्या घरातून अंदाजे ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि ५० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण,असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच समर्थ नगर,मोहोळ येथील मुकेश रामचंद्र बारबोले यांच्या घरातून अंदाजे २ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण आणि ५ हजार रुपये किमतीचे आणखी एक जोड चांदीचे पैंजण,असा एकूण ७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दोन्ही घरांतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत १ लाख ७ हजार रुपये असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घरातील व्यक्तींच्या संमतीशिवाय कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३०५(अ) प्रमाणे २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील करीत आहेत. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे पुढील तपासात महत्त्व राहणार आहे.
