महाराष्ट्र स्वागत समितीच्या अध्यक्षपदी डॉ.अमरनाथ सोलपुरे; समन्वयकपदी विजयकुमार हत्तुरे
बसवकल्याण : बसवकल्याण (जि.बिदर,कर्नाटक) येथे २४, २५ आणि २६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या कल्याण पर्व रौप्यमहोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वागत समिती तसेच विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
श्री मनीरंजन महाजगद्गुरु गंगादेवी माताजी,अध्यक्ष,बसव धर्मपीठ (कुडलसंगम) तसेच परमपूज्य जगद्गुरु सिद्धरामेश्वर स्वामीजी, अध्यक्ष, अल्लम प्रभू शून्य पीठाधीश (बसवकल्याण) यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची घोषणा करण्यात आली.
महोत्सवाच्या महाराष्ट्र स्वागत समितीच्या अध्यक्षपदी शरण डॉ.अमरनाथ सोलपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील भाविकांच्या सहभागाचे नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी पार पडणार आहे.
तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून शरण विजयकुमार हत्तुरे, माजी परिवहन सभापती, सोलापूर महानगरपालिका, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सह-समन्वयक म्हणून शरण प्रा. भिमराव पाटील (सर), शरण प्रा. सुनील हेंगणे, शरण सतीश पाटील (अध्यक्ष, राष्ट्रीय बसव दल, पुणे), शरण मल्लिकार्जुन तगारे आणि शरण सुशीलकुमार जिवणे यांची निवड करण्यात आली आहे.
महोत्सवाच्या नियोजन बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने बसवभक्त,शरण-शरणी सहभागी व्हावेत यासाठी जनजागृती मोहीम,निवास व्यवस्था, महाप्रसाद-दासोह, स्वयंसेवकांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या रौप्यमहोत्सवाला देशभरातील संत-महंत,मठाधीश, धर्मगुरू,सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने बसवभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महात्मा बसवेश्वरांनी दिलेला समता,कायक,दासोह आणि मानवतेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
महाराष्ट्र स्वागत समितीच्या वतीने सर्व बसवभक्त,शरण-शरणी आणि समाजबांधवांनी या ऐतिहासिक रौप्यमहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
