सोलापूर : एकेकाळी सोलापूरच्या राजकारणात तेलुगू समाजाचे विशेषतः पद्मशाली समाजाचे लक्षणीय वर्चस्व होते. या समाजातील अनेक दिग्गज नेत्यांनी शहराच्या राजकारणावर आपला ठसा उमटवत विविध राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मात्र कालांतराने राजकीय समीकरणे बदलली आणि या समाजातील जुन्या पिढीतील अनेक नेते सक्रिय राजकारणापासून दूर गेले आहेत.
पूर्वी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांमध्ये पद्मशाली समाजातील नेत्यांचा प्रभाव जाणवत होता. विधानसभा, लोकसभा तसेच महापालिका पातळीवर या समाजाचे प्रतिनिधित्व राहिले. काही नेत्यांनी सहकारी संस्था, बँका, सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही आपला प्रभाव निर्माण केला. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पद्मशाली समाजाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते.
मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली. जुन्या पिढीतील अनेक नेते सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले, तर काहींनी वयपरत्वे राजकीय सक्रियता कमी केली. परिणामी एकेकाळी प्रभावी असलेल्या नेतृत्वाची जागा नव्या राजकीय समीकरणांनी घेतली.
जुन्या नेतृत्वाच्या माघारीनंतर नव्या पिढीसमोर मोठी संधी
आजच्या परिस्थितीकडे पाहता पद्मशाली समाजाच्या राजकारणात एक महत्त्वाचा बदल दिसून येत आहे.
पद्मशाली समाजातून नवनिर्वाचित युवा आमदार सध्या सोलापुरात कार्यरत असल्याने नव्या पिढीच्या नेतृत्वाकडून समाजासह सोलापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दिग्गजांच्या राजकीय वारशानंतर आता नव्या नेतृत्वाकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
नव्या पिढीतील नेतृत्वासमोर केवळ समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचे नव्हे,तर सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याचे आव्हान आहे. रोजगार, शिक्षण,उद्योग,व्यापार,पाणी,रस्ते, नागरी सुविधा आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे आवश्यक आहे.
राजकीय वर्चस्वापेक्षा प्रभावी प्रतिनिधित्वाची गरज
सोलापूरच्या राजकारणात एखाद्या समाजाचे संख्याबळ किंवा राजकीय वर्चस्व यापेक्षा त्या समाजातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांसाठी किती प्रभावीपणे काम करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. पद्मशाली समाजातील जुन्या नेतृत्वाने निर्माण केलेली सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी आणि आजच्या नव्या पिढीचे नेतृत्व यांचा मेळ घातला,तर समाजाच्या राजकीय प्रभावाला पुन्हा नवी दिशा मिळू शकते.
त्यामुळे एकेकाळी सोलापूरच्या राजकारणात प्रभावी असलेले पद्मशाली समाजातील जुने नेतृत्व आज तुलनेने शांत असले,तरी नवनिर्वाचित युवा आमदाराच्या रूपाने नव्या नेतृत्वाचा अध्याय सुरू झाला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
आता या नव्या नेतृत्वाकडून पद्मशाली समाजासह संपूर्ण सोलापूरच्या विकासासाठी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
