Ticker

6/recent/ticker-posts

"सेवा संकल्प अभियान" अंतर्गत प्लास्टिकमुक्ती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अभियान राबवणार - मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन


सोलापूर : जिल्ह्यात 'स्वच्छता ही सेवा-२०२५' अंतर्गत प्लास्टिकचा वापर कमी करणे,प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन व वर्गीकरण करणे,पुनर्वापरास प्रोत्साहन देणे आणि ग्रामस्थांमध्ये प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजित पवार तसेच सभापती व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

सर्व गावांमध्ये "प्लास्टिकमुक्त गाव" जनजागृती अभियान राबवून ग्रामपंचायती,शाळा,महाविद्यालये,बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नागरिक,व्यापारी,दुकानदार,स्वयं-सहाय्यता गट,विद्यार्थी व युवक यांच्यामध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.


प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक कचरा संकलन मोहीम व श्रमदान आयोजित करून सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा,रस्ते,नाले,नदीकाठ व जलस्रोत परिसरातील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे. संकलित प्लास्टिक कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण,सुरक्षित संकलन, वाहतूक व शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया आणि पुनर्वापरासाठी विल्हेवाट लावण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. "ओला कचरा - सुका कचरा - प्लास्टिक कचरा" याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला,वक्तृत्व,घोषवाक्य, निबंध,रॅली,प्लास्टिक संकलन स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिला बचत गट,युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था,व्यापारी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीचा सामूहिक संकल्प घेण्यात येत आहे. कापडी व कागदी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करून स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून पर्यायी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे.



कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग - प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर घराघरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा,प्लास्टिक कचरा तसेच इतर कचऱ्याचे स्वतंत्र वर्गीकरण करूनच कचरा संकलन यंत्रणेकडे सुपूर्द करावा. "ओला कचरा - सुका कचरा - प्लास्टिक कचरा वेगळा,गाव स्वच्छ आणि सुंदर" या संकल्पनेवर आधारित जनजागृती करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील घनकचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम करून प्रत्येक घर,दुकान,शाळा,अंगणवाडी, शासकीय कार्यालये, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणांहून नियमितपणे वर्गीकृत कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे. ओल्या कचऱ्यापासून स्थानिक पातळीवर कंपोस्ट खत निर्मितीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. घरगुती स्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर कंपोस्ट खड्डे,नाडेप पद्धत,कंपोस्टिंग युनिट,वर्मी-कंपोस्टिंग इत्यादी उपलब्ध व स्थानिक परिस्थितीस अनुरूप पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. "ओला कचरा जागेवरच प्रक्रिया" या संकल्पनेनुसार घरगुती ओला कचरा घराच्या परिसरात अथवा ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या ठिकाणी कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया करण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या कचरा प्रक्रिया केंद्रांचा व MRF केंद्रांचा प्रभावी वापर करून संकलित सुका कचरा व प्लास्टिक कचऱ्याचे पुढील वर्गीकरण करण्यात येत आहे. पुनर्वापरयोग्य साहित्य अधिकृत पुनर्वापर यंत्रणेकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. कंपोस्टिंग प्रक्रियेतून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर ग्रामपंचायत परिसरातील उद्याने, वृक्षारोपण,शाळा परिसर,सार्वजनिक ठिकाणे व शेतीसाठी करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.



घरगुती कंपोस्टिंगचा अवलंब करणाऱ्या कुटुंबांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांचा, शाळांचा, महिला बचत गटांचा व ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. बाजारपेठा,हॉटेल्स,उपाहारगृहे,मंगल कार्यालये व इतर आस्थापनांमधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन व स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित आस्थापनांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे. 





अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फोटो,व्हिडिओ,रील्स,यशोगाथा व संक्षिप्त माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

"प्लास्टिकमुक्त गाव - स्वच्छ व निरोगी गाव" या संकल्पनेनुसार सदर अभियान लोकसहभागातून प्रभावीपणे राबवावे,असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले आहे.