Ticker

6/recent/ticker-posts

फाईल पुढे पाठविण्यासाठी ८,५०० रुपयांची लाच; जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकाला ३ वर्षांची शिक्षा


कनिष्ठ लिपिकाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल पुढे पाठविण्यासाठी ८,५०० रुपयांची लाच; जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकाला ३ वर्षांची शिक्षा

सोलापूर : विशेष न्यायालयाचा निकाल; १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांचा कारावास

सोलापूर : कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून ती वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी ८ हजार ५०० रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे यांना विशेष न्यायालय, सोलापूर यांनी दोषी ठरविले आहे. न्यायालयाने त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये ३ वर्षांचा सक्षम कारावास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांचा सक्षम कारावास भोगावा लागणार आहे.

ही घटना सन २०१९ मध्ये घडली होती. कनिष्ठ लिपिक पदाच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल तयार करून वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवक गिरीशचंद्र वाघमारे यांनी तक्रारदाराकडे ८,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.



तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सोलापूरकडून लाचेचा सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी वाघमारे यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले.

या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे,सोलापूर शहर येथे गु.र.नं. ८९४/२०१९ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक कविता मुसळे,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सोलापूर यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध विशेष न्यायालय,सोलापूर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणाचा विशेष खटला क्रमांक २५/२०२१ असा होता. नियमित सुनावणीनंतर २२ सप्टेंबर २०२६ रोजी डी.एन. सुरवसे,जिल्हा न्यायाधीश-३,सोलापूर यांच्या न्यायालयात आरोपी गिरीशचंद्र सुदामराव वाघमारे यांना दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावण्यात आली.



सरकार पक्षाकडून ॲड.प्रकाश जन्नु यांनी बाजू मांडली
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड.प्रकाश जन्नु यांनी काम पाहिले,तर आरोपीतर्फे ॲड.सुरेश पाटील-कुरुलकर यांनी बाजू मांडली.



या प्रकरणात शिरीष सरदेशपांडे,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे,अजीत पाटील,अपर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे तसेच प्रशांत चौगुले,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई व न्यायालयीन कामकाज पार पडले.

न्यायालयीन कामकाजात मपोशि/२०४० मधुमती शिंदे व मपोशि/१७७२ गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून काम पाहिले.