जल,ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्याचा अनोखा संदेश; नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक
सोलापूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वैराग पोलीस स्टेशनने अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन न करता मूर्तिकाराला मूर्ती दान करून जलप्रदूषण टाळण्याचा आदर्श पोलिसांनी घालून दिला.
सोलापूर जिल्ह्यात ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न गंभीर असताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ध्वनीप्रदूषणविरोधी भूमिकेला प्रतिसाद देत वैराग पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान फटाक्यांचा वापर टाळला. तसेच पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला.
गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिकाराला बोलावून गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान करण्यात आली. दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय आणि जलप्रदूषण टाळण्याचा संदेश या कृतीतून देण्यात आला.
या उपक्रमातून जलप्रदूषण,ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण टाळण्याचा तिहेरी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव,पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
पोलिसांनी राबविलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, “गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करा,मात्र पर्यावरणाचीही काळजी घ्या” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
