Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अनधिकृत शेड उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल


सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, मोहोळ येथील शाळेच्या आवारात अनधिकृतपणे शेड उभारून अतिक्रमण केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या जनरल डायरी नोंदीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व ०२ च्या कंपाऊंडच्या आतील पश्चिम बाजूस कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले.





या शेडचा वापर केल्यामुळे शाळेच्या जागेचा अनधिकृत वापर होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराची शेजारी व स्थानिकांकडून चौकशी करण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने शेड उभारल्याची माहिती मिळाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.



तक्रारदार ज्ञानेश्वर अर्जुन सोनटक्के (वय ४२) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अतुल दत्तात्रय क्षीरसागर व इतर व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२९(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





या प्रकरणाची नोंद मोहोळ पोलीस ठाणे गु.र.नं. ८२९/२०२६ अशी असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित शेडमुळे शाळेच्या जागेच्या वापराबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.