निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी
सोलापूर : एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांनी सीओईपी परिसरातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या अडचणी आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशाने केलेल्या वार्तांकनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या कारवाईचा पत्रकार कृती समिती,सोलापूर यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.
यासंदर्भात पत्रकार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रकरणाची वरिष्ठ व निष्पक्ष अधिकाऱ्यामार्फत कायदेशीर चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पत्रकाराने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे,प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हा पत्रकारितेचा मूलभूत भाग आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या कामाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामागील वस्तुस्थिती आणि कायदेशीर आधाराची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले.
मंदार गोंजारी हे निर्भीड पत्रकार म्हणून परिचित असून त्यांना प्रतिष्ठित रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर कायदेशीर कारवाई होत असेल,तर त्यातून पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात,अशी भूमिका पत्रकार कृती समितीने व्यक्त केली.
कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास नियमानुसार चौकशी व कारवाई करण्यास पत्रकार कृती समितीचा विरोध नाही. मात्र,पत्रकारितेचे कर्तव्य बजावत असताना कोणत्याही पत्रकारावर अनावश्यक दबाव निर्माण होऊ नये,अशी स्पष्ट भूमिका समितीने घेतली.
सदर गुन्ह्याची वरिष्ठ व निष्पक्ष अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून वस्तुस्थिती तपासावी. तसेच कारवाई तथ्यहीन किंवा कायदेशीर आधाराविना असल्याचे निष्पन्न झाल्यास कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी पत्रकार कृती समितीचे सचिव युनूस अत्तार आणि खजिनदार सैफन शेख, डीडी पांढरे यांच्यासह अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही. निर्भीड पत्रकारितेच्या पाठीशी पत्रकार कृती समिती ठामपणे उभी असून,पत्रकारांना कोणत्याही दबावाशिवाय आपले कर्तव्य बजावता यावे यासाठी समिती आवश्यक त्या कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
