Ticker

6/recent/ticker-posts

रेशीम दिनानिमित्त सोलापुरात डिजिटल रेशीम कार्यशाळेचा शुभारंभ

३२ साप्ताहिक सत्रातून रेशीम उत्पादकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सोलापूर :  1 सप्टेंबर रेशीम दिनाचे औचित्य साधून जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष–एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प (ITDP), कृषी विज्ञान केंद्र,मोहोळ व बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल रेशीम कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यात रेशीम उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतची मूल्यसाखळी विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर रेशीम क्लस्टर विकसित करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे. या अनुषंगाने रेशीम उत्पादक तसेच रेशीम शेतीत नव्याने सहभागी होऊ इच्छिणारे युवा व होतकरू शेतकरी यांच्यासाठी या डिजिटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.





कार्यशाळेअंतर्गत एकूण ३२ साप्ताहिक सत्रे घेण्यात येणार असून,प्रत्येक शुक्रवारी एक सत्र आयोजित केले जाणार आहे. तुती रोपलागवड व व्यवस्थापन,तुती बागेची निगा, रेशीम किड्यांचे संगोपन,रोग व कीड व्यवस्थापन,कोष उत्पादन व गुणवत्तावाढ,काढणीपश्चात प्रक्रिया तसेच कोषाची बाजारपेठ,विक्री व विपणन व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.




या कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार, एपीएमसी हिरजचे विनोद पाटील, ITDPचे प्रकल्प समन्वयक रोहित अदमाने आणि कृषी पर्यटन तज्ज्ञ अविनाश एखंडे उपस्थित होते. यावेळी २४ रेशीम उत्पादक शेतकरी आणि रेशीम कोष खरेदीदार उपस्थित होते.





शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेची माहिती मिळणार “शेतकऱ्यांना रेशीम शेतीतील शास्त्रीय तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि बाजारपेठेची माहिती मिळावी, तसेच उत्पादनाची गुणवत्ता व उत्पन्न वाढावे, या उद्देशाने डिजिटल रेशीम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या ३२ साप्ताहिक सत्रांचा रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल.”  - विनीत पवार, जिल्हा रेशीम अधिकारी,सोलापूर