सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस ३ महिन्यांची साधी कैद व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, १४ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता १७ वर्षे ८ महिन्यांची अल्पवयीन मुलगी संगमेश्वर कॉलेज, सात रस्ता, सोलापूर येथे अकाउंटचा पेपर देण्यासाठी गेली होती. परीक्षा संपल्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्या आई-वडिलांनी नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी करून माहिती घेतली असता, आरोपी सौरभ संजय पाताळे (वय २१, रा. घर क्र. ५४६, नॉर्थ कसबा,सोलापूर) हा महाविद्यालयात तिची ओळख वाढवून तिच्याशी जवळीक साधत असल्याचे तसेच तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले.
मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ व POCSO Act कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सपोनि चानकोटी यांनी केला. तपासादरम्यान संबंधित साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध कागदपत्रे व इतर पुरावे संकलित करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
प्रकरणातील जबाब व तपास कागदपत्रांमध्ये असलेल्या तथ्यांच्या आधारे मा. न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी आरोपी सौरभ संजय पाताळे यास IPC कलम ३५४ अंतर्गत ३ महिन्यांची कैद व २ हजार रुपये दंड, तसेच POCSO Act कलम १२ अंतर्गत ३ महिन्यांची कैद व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक दंडासाठी १५ दिवसांची अतिरिक्त कैद भोगावी लागणार आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कविता बागल यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजात पोलीस प्यारेन नदाफ,पोलीस हवालदार राजेश डाकेवाड,पोलीस नाईक रामू मुंदडे आणि मपोहेवा मंदाड यांनी काम पाहिले.
पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे तसेच न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे योग्य पद्धतीने सादर करण्यात आल्याने आरोपीस शिक्षा झाली.
