मोहोळ पोलिसांत दाखल गुन्ह्यात प्रकाश सोनार व नितीन पोतदार यांना दिलासा; न्यायमूर्ती अश्विन डी.भोबे यांचा आदेश
सोलापूर : मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांशी संबंधित पॉक्सो कायद्याच्या प्रकरणात दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपी प्रकाश अशोक सोनार (वय ३६, रा.मैंदर्गी,ता.अक्कलकोट,जि.सोलापूर) आणि नितीन शिवानंद पोतदार (वय २१,रा.मोहोळ,जि.सोलापूर) यांना हा दिलासा मिळाला आहे.
मोहोळ पोलीस ठाण्यात १४ एप्रिल २०२४ रोजी गु.र.क्र. २४७/२०२४ अन्वये आरोपी आकाश शिवानंद पोतदार, प्रकाश अशोक सोनार आणि नितीन शिवानंद पोतदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमके प्रकरण काय?
फिर्यादीच्या जबाबानुसार, १३ एप्रिल २०२४ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास खंडाळी,ता.मोहोळ,जि. सोलापूर येथील फिर्यादीच्या घराच्या परिसरात आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच तिला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
घटनेनंतर फिर्यादीला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. तेथून प्राप्त झालेल्या जबाबाच्या आधारे मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणात भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ब), ४५२, ३२३, ५०६ व ३४, तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ (POCSO) मधील कलम ८ व १२ अंतर्गत आरोप नोंदविण्यात आले होते.
उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज - या प्रकरणातील आरोपी प्रकाश अशोक सोनार आणि नितीन शिवानंद पोतदार यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता.
आरोपींच्या वतीने न्यायालयासमोर युक्तिवाद करताना,सदर प्रकरणाच्या तपासासाठी आरोपींची अटक आवश्यक नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्याची तयारी आरोपींनी दर्शविली. आरोपींच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा,अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.
न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांचा आदेश - दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय,कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अश्विन डी.भोबे यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी प्रकाश अशोक सोनार आणि नितीन शिवानंद पोतदार यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करून त्यांना दिलासा दिला आहे.
आरोपींच्या वतीने वकिलांची फौज - या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. कदीर औटी, ॲड.सौरभ तांदळे, ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड. मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड. अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.भाग्यश्री जगदाळे,ॲड. पैगंबर सय्यद,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार आणि ॲड.प्रदिप गायकवाड यांनी काम पाहिले.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने या प्रकरणातील आरोपींना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. मात्र, अटकपूर्व जामीन हा दोषमुक्ततेचा निर्णय नसून प्रकरणाचा तपास व पुढील न्यायालयीन प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहणार आहे.
