Ticker

6/recent/ticker-posts

‘जवाब दो आंदोलन’च्या माध्यमातून मराठीच्या घसरलेल्या निकालावर सवाल; शिक्षण विभागाने कृती आराखडा जाहीर करावा - उत्तम नवगिरे


SSC 2025 मध्ये मराठी प्रथम भाषेचा निकाल 94.13%; 2024 च्या तुलनेत 2.36 टक्क्यांची घसरण

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) परीक्षेतील मराठी प्रथम भाषा विषयाच्या निकालात झालेली घसरण चिंतेचा विषय बनली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता उत्तम नवगिरे यांनी ‘जवाब दो आंदोलन’ च्या माध्यमातून शिक्षण विभागाला थेट सवाल उपस्थित केले आहेत.

उपलब्ध अधिकृत विषयवार आकडेवारीनुसार, SSC 2025 मध्ये मराठी प्रथम भाषा विषयाची परीक्षा 10,85,176 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 10,21,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 63,658 विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मराठी प्रथम भाषेचा उत्तीर्णतेचा दर 94.13 टक्के राहिला.
मात्र, SSC 2024 मध्ये मराठी प्रथम भाषा विषयाचा निकाल 96.49 टक्के होता. त्यामुळे एका वर्षात मराठी विषयाच्या निकालात 2.36 टक्के गुणांची घट झाल्याचा मुद्दा नवगिरे यांनी उपस्थित केला आहे.

‘मराठीसाठी विशेष नियोजन कुठे आहे?’
इंग्रजी विषयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी शाळा आणि शिक्षण विभागाच्या पातळीवर अतिरिक्त तास, विशेष मार्गदर्शन, remedial teaching तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. मग मराठी विषयात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशाच स्वरूपाचे विशेष नियोजन केले जाते का? असा सवाल ‘जवाब दो आंदोलन’च्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मराठी विषयात विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने कोणते ठोस नियोजन केले आहे, याचे उत्तर शिक्षण विभागाने द्यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील निकालाबाबतही प्रश्नांची सरबत्ती
सामाजिक कार्यकर्ता उत्तम नवगिरे यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद,सोलापूर यांना सोलापूर जिल्ह्यातील मराठी विषयाच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी विचारलेले प्रमुख प्रश्न : 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यात मराठी विषयात किती विद्यार्थी नापास झाले?

मराठी विषयाच्या निकालाचे शाळानिहाय विश्लेषण करण्यात आले आहे का?

मराठी विषयासाठी शाळांमध्ये अतिरिक्त तास घेतले जातात का?

मराठी विषयात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी Remedial Teaching किंवा विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत का?
2026-27 या शैक्षणिक वर्षात मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने कोणते लक्ष्य निश्चित केले आहे?
या उद्दिष्टासाठी कोणता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे?

‘प्रश्न केवळ टक्क्याचा नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे’
मराठी विषयाच्या निकालातील घसरण ही केवळ आकडेवारीची बाब नसून विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता, आकलनशक्ती, लेखनकौशल्य आणि शैक्षणिक भवितव्याशी संबंधित बाब आहे, असे उत्तम नवगिरे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना मराठी विषयात सक्षम करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक शैक्षणिक साधने, अतिरिक्त मार्गदर्शन आणि मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अध्यापनाची प्रभावी व्यवस्था करणे गरजेचे आहे. केवळ निकाल जाहीर करून न थांबता विषयनिहाय आणि शाळानिहाय निकालाचे विश्लेषण करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे,अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘Gen Alpha विचारणार,शिक्षणाधिकारी जवाब देणार!’
या सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाने स्पष्टपणे द्यावीत, अशी मागणी करत ‘जवाब दो आंदोलन’ उभारण्यात येणार असल्याचे नवगिरे यांनी म्हटले आहे.

“प्रश्न केवळ मराठीच्या टक्क्याचा नाही; प्रश्न विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि शैक्षणिक भवितव्याचा आहे. Gen Alpha विचारणार आणि शिक्षणाधिकारी जवाब देणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

‘शिक्षणातून आत्मसन्मान, संविधानातून परिवर्तन!’ या भूमिकेतून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता उत्तम नवगिरे यांनी सांगितले.