सौरऊर्जा प्लांट व नदीकाठावरील मोटारींच्या कॉपर वायर चोरीचा पर्दाफाश; ६ गुन्ह्यांची उकल
२१ वर्षीय आरोपी जेरबंद; १४५ किलो कॉपर वायर जप्त, १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सौरऊर्जा प्लांट तसेच नदीकाठावरील इलेक्ट्रिक पंप व पानबुडी मोटारींच्या केबलमधील कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करून एकूण ६ चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून १४५ किलो वजनाची कॉपर वायर जप्त करण्यात आली असून, सुमारे १ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सौरऊर्जा प्लांट,इलेक्ट्रिक पंप व पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सदर गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात - पथक मौजे रानमसले,ता.उत्तर सोलापूर येथे असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,रानमसले येथील समाधान नवनाथ पवार (वय २१) याने साथीदारासह गौडगाव,ता.बार्शी येथील सोलर प्लांट तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील उंदरगाव,वडशिंगे,बेंबळे,रांझणी,ता.माढा आदी ठिकाणी कॉपर वायर चोरी केली आहे. चोरीचा माल विक्री करण्याच्या तयारीत तो घराजवळ थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी रानमसले येथे जाऊन समाधान पवार याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता एका खोलीमध्ये प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेली कॉपर वायर आढळून आली.
रानात वायर जाळून तांबे वेगळे करण्याची पद्धत
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने आपण व आपल्या एका साथीदाराने मागील काही महिन्यांपासून विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी सोलर प्लांट तसेच नदीकाठावरील मोटारींच्या कॉपर व केबल वायरची चोरी केल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
चोरी केलेली केबल वायर रानामध्ये जाळून त्यातील तांबे वेगळे करून ते प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी ठेवत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
आरोपीकडून एकूण १४५ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली.
या ६ गुन्ह्यांची उकल आरोपीने दाखविलेल्या चोरीच्या ठिकाणांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांचे अभिलेख तपासले असता खालील गुन्हे निष्पन्न झाले आहेत :
अ.क्र. पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक कलम
१. वैराग २४८/२०२६ बीएनएस ३०३(२)
२. माढा १२५/२०२६ बीएनएस ३०३(२)
३. माढा २११/२०२६ बीएनएस ३०३(२)
४. टेंभुर्णी ११८/२०२६ बीएनएस ३०३(२)
५. टेंभुर्णी १३९/२०२६ बीएनएस ३०३(२)
६. टेंभुर्णी २०७/२०२६ बीएनएस ३०३(२)
सदर आरोपी समाधान नवनाथ पवार याला वैराग पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २४८/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी - ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ,पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर,सफौ नारायण गोलेकर,धनाजी गाडे,पोहेकॉ नागेश कोणदे,मोहन मनसावाले,तसेच पोलीस अंमलदार दिनेश पवार,कोंडीबा मोरे,अक्षय डोंगरे,सतीश बुरकुल,कपिल काटकर आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांचा सहभाग होता.
