उपाध्यक्ष अमर रच्चा,खजिनदार अशोक माचन तर सचिवपदी मधुकर गाजूल यांची निवड
सोलापूर : क्रांती चौक,कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर, कुंभारी येथील श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (वर्ष २०२६-२७) नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण गाजूल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अमर रच्चा, खजिनदारपदी अशोक माचन, तर सचिवपदी मधुकर गाजूल यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांची जबाबदारी नवनिर्वाचित कार्यकारिणीवर सोपविण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत - नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण गाजूल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ सदस्य आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
धार्मिक वातावरणासोबत सामाजिक उपक्रमांवर भर
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण गाजूल यांनी मंडळाची जुनी परंपरा आणि संस्कृती कायम राखत आगामी गणेशोत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“मंडळाची परंपरा कायम राखत आगामी गणेशोत्सव अत्यंत दिमाखात, भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात येईल. उत्सवाला विविध सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात येणार असून, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडला जाईल. मंडळाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्याने योग्य पद्धतीने पार पाडू,” असा विश्वास अरुण गाजूल यांनी व्यक्त केला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने विविध धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
परिसरातील नागरिकांचा सहभाग वाढवून एकता,सामाजिक बांधिलकी आणि बंधुभावाचा संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते,ज्येष्ठ मार्गदर्शक, नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी गणेशोत्सवासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
