Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांवरील खंडणी गुन्ह्यांप्रकरणी पत्रकार आक्रमक

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेत निवेदन सादर; स्वतंत्र चौकशीची मागणी

सोलापूर : महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले,मारहाण, धमकी तसेच बातमी प्रसिद्ध करण्यावरून दबाव आणण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वाळू माफिया, गुटखा माफिया तसेच काही राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांना धमकावले जात असल्याचा आरोप पत्रकार सुरक्षा समितीने केला आहे. 

अशा परिस्थितीत पत्रकारिता करायची कशी,असा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाहीचा चौथा स्तंभ अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असल्याचे समितीने म्हटले आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांवर बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अल्प मानधनावर काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असताना त्यांच्यावर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांवरही आर्थिक व सामाजिक संकट निर्माण होते,असे समितीने निवेदनात म्हटले आहे.



काही अवैध व्यावसायिक तसेच काही अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती देत ग्रामीण भागातील प्रामाणिक पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करतात, असा आरोप पत्रकार सुरक्षा समितीने केला आहे. अशा गुन्ह्यांमुळे पत्रकारांची समाजातील प्रतिमा मलिन होते आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरही परिणाम होतो,असे समितीने नमूद केले.



सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,पंढरपूर,अक्कलकोटसह अन्य तालुक्यांतील पत्रकारांवर दाखल असलेल्या खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची स्वतंत्र व सखोल चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या माध्यमातून करण्यात यावी,अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने केली.

या मागणीसाठी समितीच्या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.



यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,सोलापूर जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी,सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू,समन्वयक लक्ष्मण सुरवसे,सचिव रमेश दग्गारी,संघटक गणेश निंबाळकर,रशीद शेख,बसवराज हमाले,परमेश्वर आटीपामूल आदी उपस्थित होते.





चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा - “सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनाच्या दरबारात मांडून वंचित, अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त नागरिकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची भूमिका प्रामाणिक पत्रकार बजावत आहेत. अशा पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी?” असा सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित केला.

पत्रकारांवर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांमुळे समाजात त्यांची बदनामी होत असून त्यांची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांवर दाखल असलेल्या अशा गंभीर गुन्ह्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून स्वतंत्र व सखोल चौकशी करावी,अन्यथा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यशवंत पवार यांनी दिला.