ईद-ए-मिलाद-उन-नबी शांतता,शिस्त आणि बंधुभावाने साजरी करा : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आवाहन
नागपूर : ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मुबारक पर्वानिमित्त नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी जलसे आणि जुलूसचे आयोजन करण्यात येत आहे. या पवित्र आणि मंगलमय प्रसंगी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधव, युवक आणि अकीदतमंदांना शांतता, शिस्त आणि बंधुभावाने ईद-ए-मिलाद साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
प्यारे खान यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,जुलूस आणि जलसेदरम्यान प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना,नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे प्रत्येकाने पूर्णपणे पालन करावे. तसेच पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे.
ईद-ए-मिलाद-उन-नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो प्रेम,मानवता,संयम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. त्यामुळे या पवित्र प्रसंगी प्रत्येकाच्या कृतीतून याच सुंदर संदेशाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे,असेही प्यारे खान यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “आपण सर्वांनी मिळून हा मुबारक प्रसंग अदब,अकीदत,शिस्त आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरा करूया. आपल्या प्रत्येक कृतीतून शांतता,प्रेम आणि मानवतेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवूया.”
ईद-ए-मिलादच्या जुलूस व जलशांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांनी विशेषतः प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,तसेच पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शांतता,सलोखा, प्रेम आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण व्हावे,हीच खरी या पवित्र दिवसाची भावना आहे,असे प्यारे खान यांनी आपल्या संदेशातून स्पष्ट केले.
