Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात पीसीसी पॅनल चोरीचा पर्दाफाश; सराईत आरोपी जेरबंद


आरोपीकडून ५ लाख ४८ हजारांचा माल, आयशर ट्रक व दोन मोबाईलसह २१ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : वाहतुकीच्या व्यवसायाच्या नावाखाली विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा पीसीसी पॅनलचा माल लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला सोलापूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीचा ५ लाख ४८ हजार २५८ रुपये किमतीचा पीसीसी पॅनल पट्टीचा माल, गुन्ह्यात वापरलेला १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक तसेच ६५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, असा एकूण २१ लाख १३ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी परवेज फैजअहमद मोहोलकर (वय ३५) यांचा सोलापूर शहरात मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून माल वाहतुकीचे काम दिले होते. याच दरम्यान आरोपीने मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला.



आरोपीने मालवाहतुकीचे भाडे ठरवून घेतल्यानंतर उमर ट्रेडर्स, सुनीलनगर,एम.आय.डी.सी. सोलापूर येथून पीसीसी पॅनल पट्टीचा माल आयशर ट्रकमध्ये भरून घेतला. सदर माल कर्नाटकातील विजयपूर येथे पोहोचविण्याचे सांगण्यात आले होते. मात्र,आरोपीने माल निर्धारित ठिकाणी न पोहोचवता परस्पर लंपास केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.





या प्रकरणी एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे,सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला.



गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल.टॉवरजवळ आयशर ट्रक आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान चोरीचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य पोलिसांच्या हाती लागले.



तपासात आरोपीकडून ५,४८,२५८ रुपयांचा पीसीसी पॅनल पट्टीचा माल, १५ लाख रुपयांचा आयशर ट्रक आणि ६५ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन,असा एकूण २१,१३,२५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम.राजकुमार,पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर,सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाजराव विरजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे मालवाहतुकीच्या नावाखाली चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्यास मदत झाली असून,या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.