मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या लोकायुक्तपदाची शपथ घेतली. लोकभवन,मुंबई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या.शुक्रे यांना पदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्या. सुनील शुक्रे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पाच वर्षांचा कार्यकाळ - महाराष्ट्राच्या नव्या लोकायुक्त व्यवस्थेअंतर्गत न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम, २०२३ मधील तरतुदीनुसार लोकायुक्तांचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत-यापैकी जे आधी होईल तेवढा असतो.
न्या.शुक्रे यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून १९८० मध्ये पदवी घेतली आणि १९८३ मध्ये अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजमधून एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. एलएल.बी. परीक्षेत त्यांनी गुणवत्ता क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवला होता.
लोकायुक्त संस्थेची भूमिका महत्त्वाची - राज्यातील प्रशासनातील भ्रष्टाचार,गैरप्रकार आणि लोकसेवकांविरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी लोकायुक्त संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. नव्या कायदेशीर चौकटीमुळे संस्थेच्या रचनेत आणि कार्यपद्धतीत बदल करण्यात आले असून,ऑगस्ट महिन्यात लोकायुक्त संस्थेवरील दोन न्यायिक आणि दोन बिगर-न्यायिक सदस्यांचाही शपथविधी पार पडला आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या कामकाजाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्या. सुनील शुक्रे यांच्या अनुभवाचा आणि न्यायिक पार्श्वभूमीचा लोकायुक्त संस्थेच्या कामकाजाला फायदा होईल,अशी अपेक्षा आहे.
दरम्यान,न्या.सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेला नवे नेतृत्व मिळाले असून, नागरिकांच्या तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी त्यांच्या कार्यकाळाकडे विशेष लक्ष लागले आहे.
