सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; अभियोग पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश
सोलापूर : आईला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाप्रकरणी आरोपी बबलू उर्फ प्रदीप अण्णासाहेब शिंदे (वय ३२, रा.मलिकपेठ,ता.मोहोळ,जि. सोलापूर) यांची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
मोहोळ पोलीस ठाण्यात दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी गु.र.क्र. ७९४/२०२३ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२३ व ५०४ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी लक्ष्मी शिंदे यांच्या तक्रारीनुसार,दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपीने त्यांना शेताकडे बोलावून विहिरीजवळ शिवीगाळ व मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलल्याचा आरोप करण्यात आला होता. आरडाओरड केल्यानंतर पती व गावातील नागरिकांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला २ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक केली. तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी ३० जानेवारी २०२४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रमुख साक्षीदारानेच आरोप नाकारले - खटल्यादरम्यान आरोपीच्या वतीने बचाव पक्षाने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणातील जखमी व प्रमुख साक्षीदार असलेल्या फिर्यादी लक्ष्मी शिंदे यांनी न्यायालयात साक्ष देताना आरोपीने मारहाण केली किंवा जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलले असल्याचे स्पष्टपणे नाकारले. तसेच त्यांनी आपल्या फिर्यादीतील मजकूरही नाकारला.
घटनास्थळ पंचनामा,वैद्यकीय प्रमाणपत्रे व इतर तपासी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली असली, तरी त्यावरून फिर्यादीला झालेल्या दुखापती आरोपीनेच केल्या किंवा आरोपीनेच त्यांना विहिरीत ढकलले,हे सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
अभियोग पक्षाने आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करणे आवश्यक असून,या प्रकरणात आवश्यक व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करावी,असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश रा.म.शिंदे यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी निकाल दिला. अभियोग पक्ष आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत बबलू उर्फ प्रदीप अण्णासाहेब शिंदे यांची भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२३ व ५०४ अंतर्गत आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.भाग्यश्री जगदाळे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार,ॲड.प्रदिप गायकवाड आणि ॲड.सागर स्वामी यांनी काम पाहिले.
