शासकीय कागदपत्रे न मिळाल्याने आत्मदहनाचा इशारा; जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून तातडीने कागदपत्रे देण्याचे निर्देश
सोलापूर : कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल परसप्पा कोरे यांच्या प्रकरणात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे नगर भूमापन अधिकाऱ्यांना पत्र
सोलापूर, दि. १४ ऑगस्ट : शासकीय अभिलेख व आवश्यक कागदपत्रे मागणी करूनही ती उपलब्ध करून दिली जात नसल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटना,सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल परसप्पा कोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून न दिल्यास दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात जिल्हा अधीक्षक,भूमी अभिलेख,सोलापूर यांच्या कार्यालयाकडून नगर भूमापन अधिकारी,सोलापूर यांना महत्त्वाचे पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मागणी केलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पत्रानुसार,श्रीशैल परसप्पा कोरे यांनी आपल्या तक्रारी अर्जांमध्ये दि. ०६/०१/२०२३ पासून वेळोवेळी माहिती अधिकारात कागदपत्रांची मागणी करूनही माहिती देण्यात आलेली नसल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात सन २०२३ पासून जे कर्मचारी व अधिकारी जबाबदार आहेत,त्यांच्यावर सरकारी कागदपत्रे गहाळ केल्याबाबत अथवा संबंधित बाबींमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.
१५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा - सदर मागणी मान्य न झाल्यास कोरे हे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख,सोलापूर अथवा नगर भूमापन अधिकारी,सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने नगर भूमापन अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. कोरे यांनी मागणी केलेली कागदपत्रे उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त करावे,असे स्पष्ट निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.
आत्मदहनासारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नये
पत्राच्या प्रतिमध्ये कोरे यांनाही उद्देशून महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. संबंधित अर्ज पुढील कार्यवाहीसाठी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून,आत्मदहनासारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नये,असे त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारचा मार्ग अवलंबल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्तीवर राहील,अशी नोंदही करण्यात आली आहे.
प्रशासन आता कोणती भूमिका घेणार?
शासकीय अभिलेख आणि माहिती मिळण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या या प्रकरणात आता नगर भूमापन कार्यालयाकडून संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात का आणि कोरे यांच्या तक्रारीवर पुढील कायदेशीर कार्यवाही होते का,याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकृत पत्रामुळे या प्रकरणाला आता प्रशासकीय पातळीवर गांभीर्य प्राप्त झाले असून, १५ ऑगस्टपूर्वी प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
