Ticker

6/recent/ticker-posts

हज यात्रा झाली अधिक आधुनिक,पारदर्शक आणि यात्रेकरू-केंद्रित; डिजिटल तंत्रज्ञानासह AI सेवांवर सरकारचा भर


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने भारतीय हज यात्रेकरूंसाठी हज व्यवस्थापन अधिक आधुनिक,पारदर्शक,तंत्रज्ञानाधारित आणि यात्रेकरू-केंद्रित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विशेषतः हज-2026 मध्ये डिजिटल सेवा,ऑनलाइन प्रक्रिया, स्मार्ट उपकरणे, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदतीवर मोठा भर देण्यात आला.

हज सुव‍िधा ॲप 2.0 ठरतेय महत्त्वाचे डिजिटल माध्यम
हज यात्रेकरूंसाठी Haj Suvidha App 2.0 हे एक महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून यात्रेकरूंना प्रवासाचे वेळापत्रक,निवासाची माहिती,सामानाची माहिती, आपत्कालीन संपर्क, SOS सुविधा,आरोग्यविषयक माहिती, महत्त्वाच्या सूचना तसेच तक्रार निवारणाची सुविधा मिळते. त्यामुळे यात्रेकरूंना आवश्यक माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत आहे.



अर्जापासून निवडीपर्यंत प्रक्रिया ऑनलाइन - हज अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून यात्रेकरूंची निवड संगणकीकृत पद्धतीने केली जाते. ऑनलाइन पेमेंटची सुविधा,विमानाच्या तारखा व वेळेची पसंती नोंदविण्याची सुविधा आणि पासपोर्टची माहिती डिजिटल पद्धतीने सादर करण्यामुळे कागदपत्रांची धावपळ कमी झाली आहे.

AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची तयारी - हज व्यवस्थापनाच्या पुढील टप्प्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वापर वाढवण्याची योजना आहे. AIच्या माध्यमातून अर्ज व कागदपत्रांची पडताळणी, विविध विमानतळांवरील प्रवाशांच्या मागणीचा अंदाज घेऊन विमानांचे नियोजन आणि तक्रारींचे रिअल-टाइम ट्रॅकिंग व एस्कलेशन यांसारख्या सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

याशिवाय भविष्यात हिंदी,उर्दू आणि प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये 24 तास उपलब्ध असलेली AI-आधारित व्हॉइस सपोर्ट सेवा सुरू करण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाचा कमी वापर करणाऱ्या यात्रेकरूंना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.



स्मार्ट वॉच आणि आपत्कालीन मदत - हज-2026 मध्ये यात्रेकरूंसाठी Haj Suvidha Smart Wristbands उपलब्ध करून देण्यात आले. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेणे,त्यांना मदत करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत सहाय्य मिळवून देणे यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांवरही विशेष लक्ष - हज यात्रेदरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी सौदी अरेबियातील महत्त्वाच्या ठिकाणी क्लिनिक,वैद्यकीय केंद्रे आणि डिस्पेन्सरीची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर वैद्यकीय पथके यात्रेकरूंना सेवा देतात. तसेच हज यात्रेकरूंना व्यापक विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले असून प्रति यात्रेकरू सुमारे ₹6.25 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.



मक्का-मदिना प्रवास अधिक वेगवान - भारतीय यात्रेकरूंसाठी मक्का आणि मदिना दरम्यान हाय-स्पीड रेल्वे सेवेचा वापर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन सुरक्षितता आणि सुविधा वाढण्यास मदत झाली आहे. हज-2026 मध्ये सुमारे 60 हजार यात्रेकरूंना या रेल्वे सुविधेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने सांगितले होते.

मक्केत हॉटेलसदृश निवासाची सुविधा - हज-2026 मध्ये मक्केत भारतीय यात्रेकरूंसाठी हॉटेल-शैलीतील निवासाची व्यवस्था करण्यात आली. मिनामधील निवास व्यवस्थेतही सुधारणा करून सोफा-कम-बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

1 लाख 75 हजारांहून अधिक भारतीय यात्रेकरू
हज-2026 साठी भारतातून 1,75,025 यात्रेकरू हज यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. एवढ्या मोठ्या संख्येने यात्रेकरूंचे व्यवस्थापन करताना डिजिटल तंत्रज्ञान आणि केंद्रीकृत माहिती प्रणाली महत्त्वाची ठरत आहे.

पुढील हजसाठीही तंत्रज्ञानाचा विस्तार - हज-2026 च्या आढावा बैठकीत सरकारने AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा आणखी व्यापक वापर करण्याचे संकेत दिले आहेत. हज-2027 साठीही AI-आधारित अर्ज व कागदपत्र पडताळणी,विमान नियोजनासाठी डेटा-आधारित मागणीचा अंदाज आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

एकूणच,हज यात्रेच्या व्यवस्थापनात ऑनलाइन अर्ज, डिजिटल पेमेंट,डिजिटल कागदपत्रे,हज सुविधा ॲप,स्मार्ट उपकरणे, AI-आधारित सेवा,वैद्यकीय सुविधा,विमा संरक्षण आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था यांचा वाढता वापर दिसून येत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या सुधारणांचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीय यात्रेकरूची सुरक्षित,सुलभ,पारदर्शक, सन्मानजनक आणि सुविधायुक्त हज यात्रा सुनिश्चित करणे हा आहे.