सामाजिक बांधीलकी जपत ‘व्वा’ संस्थेचा स्तुत्य उपक्रम; मासिक स्वच्छतेबाबत महिलांना मार्गदर्शन
सोलापूर : सामाजिक बांधीलकी जपत ‘व्वा’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कारागृहातील सर्व महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व याबाबत महिलांना आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले.
हा उपक्रम कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वरिष्ठ जेलर बिरू खेळबुटे यांच्या सहकार्याने पार पडला. यावेळी ‘व्वा’ संस्थेच्या प्रतिनिधींनी महिला कैद्यांशी आत्मीयतेने संवाद साधत मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून सांगितले. महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी ‘व्वा’ संस्थेच्या संस्थापिका विद्या लोलगे यांच्यासह सायरा शेख,मारता असादे,पुष्पा हलकुडे,गौरा कोरे,कांचन चौगुले,लक्ष्मी माने आणि वैशाली देशपांडे यांनी सोलापूर जिल्हा कारागृहाला प्रत्यक्ष भेट देऊन सॅनिटरी पॅडचे वाटप केले.
महिला कैद्यांच्या आरोग्याशी निगडित गरजांची दखल घेत ‘व्वा’ संस्थेने राबविलेल्या या संवेदनशील उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला कैद्यांना आवश्यक आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध होण्यासोबतच त्यांना मानसिक आधार आणि दिलासाही मिळाला.
उपक्रमाच्या शेवटी सर्व महिला कैद्यांनी ‘व्वा’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक संस्थांनी समाजातील विविध घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत,असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
