महानगरपालिका सभागृहातील कामकाज जनतेपर्यंत थेट पोहोचावे; प्रशासन,जिल्हाधिकारी व मंत्रालयाकडे निवेदन
सोलापूर : (एमडी२४न्यूज) लोकसभा,राज्यसभा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे कामकाज ज्या पद्धतीने नागरिकांना थेट पाहता येते,त्याच धर्तीवर सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचेही थेट (Live) प्रक्षेपण करण्यात यावे,अशी महत्त्वपूर्ण मागणी पत्रकार तथा व्हिसलब्लोअर कार्यकर्ते सैफन शेख यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे विषय,ठराव,निधी, विकासकामे,प्रशासकीय निर्णय तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेतले जातात. त्यामुळे या कामकाजाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘जनतेच्या पैशातून चालणाऱ्या संस्थेचे कामकाज जनतेसमोर यावे’ सोलापूर महानगरपालिका ही नागरिकांच्या करातून आणि शासनाच्या विविध निधीतून चालणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे सभागृहातील कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता असणे गरजेचे आहे. सर्वसाधारण सभेतील चर्चा आणि निर्णय जनतेला थेट पाहता व ऐकता आले,तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक मजबूत होईल,असा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला आहे.
आजच्या डिजिटल युगात वेबसाईट,अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इतर डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था निर्माण करून नियमितपणे Live प्रसारण सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिक किंवा पत्रकाराला स्वतंत्रपणे परवानगी मिळण्याऐवजी अधिकृत व्यवस्था आवश्यक -
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण हे केवळ एखाद्या व्यक्तीला किंवा पत्रकाराला स्वतंत्रपणे दिलेल्या परवानगीवर अवलंबून न राहता महानगरपालिकेचा अधिकृत निर्णय,सभागृहाची कार्यपद्धती,प्रशासकीय मान्यता आणि आवश्यक तांत्रिक नियम निश्चित करून संस्थात्मक पद्धतीने सुरू करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे कोणत्याही एका माध्यमाला विशेषाधिकार न देता महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमातून सर्व नागरिकांना समान माहिती उपलब्ध करून देता येईल.
शासन,जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाकडे निवेदन - ही मागणी केवळ महानगरपालिका प्रशासनापुरती मर्यादित न ठेवता सोलापूर महानगरपालिका प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित शासन प्रशासन आणि मंत्रालय स्तरावर निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी शासनाने याबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना किंवा धोरण निश्चित करावे,अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
निर्भीडपणे माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश -
पत्रकार तथा व्हिसलब्लोअर कार्यकर्ते सैफन शेख यांनी ही मागणी करताना,महानगरपालिकेच्या सभागृहात होणाऱ्या चर्चेची आणि निर्णय प्रक्रियेची माहिती नागरिकांपर्यंत पारदर्शक,निर्भीड आणि थेट पद्धतीने पोहोचणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.
सभेचे अधिकृत Live प्रक्षेपण झाल्यास नागरिकांना आपल्या शहराशी संबंधित निर्णयांची माहिती मिळेल, पत्रकारांना वृत्तांकनासाठी अधिकृत स्रोत उपलब्ध होईल आणि प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर नागरिकांची देखरेखही अधिक प्रभावी होऊ शकते.
महानगरपालिकेने धोरण तयार करून तातडीने निर्णय घ्यावा - सोलापूर महानगरपालिकेने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्वसाधारण सभा,विशेष सभा तसेच नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या सभांचे अधिकृत थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच Live प्रसारणासाठी कॅमेरे,ऑडिओ व्यवस्था,इंटरनेट कनेक्टिव्हिटी,अधिकृत सोशल मीडिया/वेबसाईट प्लॅटफॉर्म, रेकॉर्डिंग व संग्रहण (Archive) आणि प्रसारणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“महानगरपालिकेच्या सभागृहात काय चर्चा होते आणि शहराच्या विकासाबाबत कोणते निर्णय घेतले जातात,हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. पारदर्शक प्रशासनासाठी सभांचे थेट प्रक्षेपण ही काळाची गरज आहे,” अशी भूमिका सैफन शेख यांनी मांडली आहे.
आता या मागणीवर सोलापूर महानगरपालिका प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासन स्तरावर कोणता निर्णय घेतला जातो,याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
