Ticker

6/recent/ticker-posts

सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक रेल्वेत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी



मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ तसेच ‘जय भवानी,जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात,अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
दिल्ली दौऱ्यावर असताना नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना यासंदर्भातील पत्रही सुपूर्द केले.

देशभर पोहोचणार छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश
सीएसएमटी हे मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावरून देशाच्या विविध भागांत दररोज मोठ्या संख्येने रेल्वेगाड्या ये-जा करतात आणि लाखो प्रवासी प्रवास करतात.

या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल,असे ॲड. राहुल नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.



रेल्वेमंत्र्यांकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा - छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्य, स्वराज्य आणि लोककल्याणाच्या विचारांची माहिती देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या माध्यमातून अशा उद्घोषणांना स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता रेल्वे मंत्रालय या मागणीवर काय निर्णय घेते,याकडे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.