Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांच्या घरकुलासाठी धरणे आंदोलनाला पत्रकार कृती समितीचा जाहीर पाठिंबा


पत्रकारांना हक्काचे घर मिळावे; केंद्र व राज्य शासनाकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रामाणिक, निर्भीड आणि पारदर्शकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधव-भगिनींना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या मागणीच्या अनुषंगाने क्रांती दिनाच्या अवचित साधून ९ ऑगस्ट रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट), सोलापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पत्रकारांच्या घरकुलाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला पत्रकार कृती समिती,सोलापूर यांनी जाहीर पाठिंबा दिला.


पत्रकार कृती समितीचे सचिव युनूस अत्तार व सैफन शेख यांनी आंदोलनस्थळी लेखी पत्र देऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या घरकुलाच्या मागणीला आपला पाठिंबा जाहीर केला. पत्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन पत्रकारांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी ठोस धोरण व अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी - पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असून,समाजातील विविध प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम पत्रकार सातत्याने करतात. अनेक पत्रकार आर्थिकदृष्ट्या अडचणीच्या परिस्थितीत काम करत असून, स्वतःचे घर असणे हे त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पात्र पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा,अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करूनही अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याने आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न केवळ एका संघटनेचा नसून पत्रकारिता क्षेत्रातील अनेक कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



पत्रकारांचा मोठा सहभाग - या धरणे आंदोलनाला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दिले. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख,जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी,जिल्हा सचिव अंबादास गज्जम,शहराध्यक्ष आन्सर तांबोळी,कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे,सचिव गणेश निंबाळकर, प्रसिद्धीप्रमुख अमोल कुलकर्णी,श्रीनिवास पेद्दी,संदीप धोत्रे, विष्णू सकट,साजिद मकानदार,साप्ताहिक ‘यश संघर्ष’चे संपादक सादिक शेख,अकबर शेख,वैजिनाथ बिराजदार, संतोष पवार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान पत्रकारांच्या घरकुलाच्या मागणीसाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी जोरदार मागणी करण्यात आली. पत्रकारांच्या न्याय्य मागणीसाठी पुढील काळातही संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.