Ticker

6/recent/ticker-posts

क्रांती दिनाचे औचित्य साधून ‘सायबर गुन्हे निर्मूलन संघर्ष समिती’ची स्थापना; सायबर गुन्हे निर्मूलन निर्धार आंदोलन


१ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींवर तातडीने कारवाईची मागणी

सोलापूर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सायबर फसवणुकीतील पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सायबर गुन्हे निर्मूलन संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली. क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ नेते व पत्रकार विष्णु कारमुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी ‘सायबर गुन्हे निर्मूलन निर्धार आंदोलन’ देखील करण्यात आले.

सध्या विविध प्रलोभने,कर्जाचे आमिष,विमा,गुंतवणूक योजना तसेच विविध आर्थिक योजनांच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अनेक वेळा सहकारी बँका,पतसंस्था तसेच सरकारी बँकांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर विविध कारणे सांगून नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

विशेषतः मोठ्या बँकांचे कर्ज मिळत नसलेल्या किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना लक्ष्य करून कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

सायबर तक्रारींच्या तपासासाठी सक्षम यंत्रणेची मागणी
१ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये स्थानिक पातळीवर तक्रारी दाखल केल्या जातात. मात्र, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरेसे नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त आणि अग्रणी बँकेकडे तक्रारी करूनही अपेक्षित पातळीवर पाठपुरावा होत नसल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

‘सायबर गुन्हे निर्मूलन निर्धार आंदोलन' ला सुरुवात
सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे ‘सायबर गुन्हे निर्मूलन निर्धार आंदोलनास’ सुरुवात करण्यात आली.

यावेळी समितीचे निमंत्रक ज्येष्ठ नेते व पत्रकार विष्णु कारमुरी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अद्ययावत सायबर विभाग उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी केली.
१ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तातडीने आणि प्रभावी कारवाई व्हावी,पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी तसेच सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी त्यांनी केली.

पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती कार्यरत राहणार सायबर फसवणुकीला केवळ आर्थिक व्यवहारातील चूक न मानता ही एक प्रकारची आर्थिक चोरी असून, त्याला आळा घालण्यासाठी जनजागृती आणि सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांनी समितीशी संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींबाबत शासन व संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही समितीच्या वतीने देण्यात आली.

युवा क्रांती सेनेचा आंदोलनाला पाठिंबा - यावेळी युवा क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकत,अलीकडेच घडलेल्या एका सायबर फसवणुकीच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांचीही आंदोलनावेळी विशेष उपस्थिती होती.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,सायबर गुन्हे विभाग सक्षम करणे, पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे आणि नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे,या प्रमुख उद्देशाने समितीची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

या आंदोलनात विठ्ठल कुर्‍हाडकर,गुरुनाथ कोळी,पप्पु शेख, श्रीनिवास बोगा,कोडम,जरगीस मुल्ला,राहुल गुजर,प्रशांत जक्का यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.