सोलापूर : (एमडी२४न्यूज) सोलापूर शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाची सध्याच्या परिस्थितीत आवश्यकता राहिली नसून,या प्रकल्पाचा शासनाने नव्याने फेरविचार करावा,अशी मागणी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री व ऍग्रीकलचर,सदस्य केतन शाह यांनी एमडी२४न्यूजशी बोलताना त्यांनी उड्डाणपूल प्रकल्पाच्या मूळ उद्देशापासून ते बदललेल्या वाहतूक परिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.
केतन शहा म्हणाले की,सन 2014–15 मध्ये तत्कालीन आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबई–पुणे ते हैदराबाद–बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावरील लांब पल्ल्याची व्यावसायिक वाहतूक (Through Traffic) सोलापूर शहरातून जात असल्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात शहरातून जाणारी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक स्थानिक वाहतुकीत मिसळत असल्याने एलिव्हेटेड रोडची गरज असल्याचे नमूद करण्यात आले होते.
मात्र,त्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की,नगर रचना विभागाच्या 2 ऑक्टोबर 2018 च्या अहवालानुसार रिंग रोड पूर्ण झाल्यास उड्डाणपुलाची गरज उरणार नाही. तसेच माजी आमदार तथा विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनीही रिंग रोड आणि बायपास झाल्यास जड वाहतुकीचा प्रश्न सुटेल,अशी भूमिका यापूर्वी मांडली होती.
पर्यायी मार्गांमुळे वाहतुकीचे चित्र बदलले - केतन शहा यांच्या मते, 2014 ते 2026 या कालावधीत केगाव-हत्तूर बायपास,मोहोळ-मंद्रूप रिंग रूट,प्रस्तावित NHAI बाह्य रिंग रोड,सुरत–चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉर,हैदराबाद रोडवरील पर्यायी मार्ग तसेच महानगरपालिकेचे 54 मीटर व 60 मीटर रिंग रोड यांसारख्या प्रकल्पांमुळे आता जड वाहतूक शहरातून जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे 12.625 किलोमीटरच्या उड्डाणपुलाची आवश्यकता उरलेली नाही, असे त्यांनी म्हटले.
सामाजिक परिणामांचा अभ्यासच नाही - या प्रकल्पासाठी सामाजिक परिणाम मूल्यांकन (Social Impact Assessment – SIA) करण्यात आले नसल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, नागरिकांना प्रत्यक्ष किती फायदा होईल आणि त्याबदल्यात किती सामाजिक व आर्थिक परिणाम सहन करावे लागतील,याचा वस्तुनिष्ठ अभ्यास शासनाने केलेला नाही.
त्यांच्या मते,सोलापूरमध्ये आजही नियमित पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन,आधुनिक ड्रेनेज,शहर बस सेवा आणि चांगले रस्ते या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. अशा वेळी हजारो कोटींचा खर्च उड्डाणपुलावर करण्याऐवजी तो शहराच्या मूलभूत सुविधांवर खर्च करणे अधिक गरजेचे आहे.
कमी खर्चात वाहतूक सुधारू शकते - शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सलग 7.70 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता नसून,रस्ता रुंदीकरण,अंडरपास,छोटे उड्डाणपूल,वन-वे व्यवस्था,सिग्नल,सार्वजनिक परिवहन आणि अतिक्रमण हटविणे यांसारख्या उपायांनीही वाहतुकीची समस्या सोडवता येऊ शकते,असे त्यांनी सांगितले.
HAM मॉडेल आणि टोलवरही प्रश्न - पूर्वी EPC मॉडेलवर प्रस्तावित असलेला उड्डाणपूल आता HAM (Hybrid Annuity Model) पद्धतीने उभारला जाणार असल्याचे सांगत केतन शहा यांनी भविष्यात टोल आकारणीची शक्यता व्यक्त केली. बायपासमार्गे जाणारी बाहेरील वाहतूक टोल भरून शहरातील उड्डाणपुलाचा वापर करणार नाही,असा त्यांचा दावा आहे.
प्रकल्पाच्या आराखड्यावर आक्षेप - सध्याच्या आराखड्यात विजापूर रोड आणि होटगी रोडसाठी थेट उतरण्याची सुविधा नसल्याने शहरातील मोठा वाहनवर्ग उड्डाणपुलाचा वापर करणार नाही,असे ते म्हणाले. उड्डाणपुलाचे खांब उभारल्यामुळे खालील रस्ते अरुंद होतील,वाहतूक कोंडी वाढेल,व्यापारी आस्थापनांवर परिणाम होईल आणि टोलमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल,अशीही त्यांनी भीती व्यक्त केली.
भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत दाखल झालेल्या रेफरल याचिकांमुळे भविष्यात वाढीव आर्थिक भार महानगरपालिका आणि पर्यायाने सोलापूरच्या करदात्यांवर पडू शकतो,असेही त्यांनी नमूद केले.
'1000 कोटींचा उड्डाणपूल नेमका कुणासाठी?'
"आज बदललेल्या परिस्थितीत जड वाहतुकीसाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सुमारे 1000 कोटी रुपयांचा उड्डाणपूल कोणाच्या हितासाठी उभारला जात आहे,याचा शासनाने सर्वंकष फेरविचार करावा," अशी मागणी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री व ऍग्रीकलचर,सदस्य केतन शहा यांनी एमडी२४न्यूजशी बोलताना केली.
