Ticker

6/recent/ticker-posts

‘मंच शुद्धीकरणा’वरून राज्यसभेत गदारोळ; खर्गे संतप्त,नड्डा म्हणाले - ‘घटनेची चौकशी करू’


हल्द्वानीतील ‘मंच शुद्धीकरणा’वरून राज्यसभेत गदारोळ; खर्गे संतप्त,नड्डा म्हणाले - ‘घटनेची चौकशी करू’

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर मंचाचे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यासाठी हवन करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. खर्गे यांनी हा प्रकार आपल्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद असल्याचे सांगत भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. 

‘मी कोणत्याही धर्माचा उल्लेख केला नाही’- खर्गे
राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करताना खर्गे म्हणाले की, त्यांनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले होते. त्यांच्या भाषणात कोणत्याही समुदायाचा किंवा धर्माचा उल्लेख करण्यात आला नव्हता. “मी फक्त सरकारशी संबंधित प्रश्न आणि जनतेच्या समस्या मांडल्या,” असे त्यांनी सांगितले.

मात्र,त्यांच्या भाषणानंतर मंचावर हवन करून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “लोकशाहीमध्ये असे घडते का? तुम्ही संविधानाचे रक्षण कसे करणार?” असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला.





‘मला अस्पृश्यासारखे वागवले’ या घटनेमुळे आपल्याला अत्यंत वाईट वाटल्याचे सांगताना खर्गे यांनी हा प्रकार जातीय भेदभावाशी जोडला. त्यांनी आपली सामाजिक ओळख राजकीय मुद्दा बनवायची नसल्याचे स्पष्ट केले,मात्र एखाद्या व्यक्तीने भाषण केल्यानंतर त्याच मंचाचे ‘शुद्धीकरण’ केले जाणे हा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. खर्गे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी बाकांवरून प्रतिक्रिया उमटल्याने सभागृहात काही काळ वातावरण तापले. या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.

जेपी नड्डा काय म्हणाले? राज्यसभेतील सभागृह नेते आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या घटनेपासून भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. नड्डा यांनी अशा प्रकारच्या कृतीला भाजपचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले असून,या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल,असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. नड्डा यांनी हा प्रकार केवळ काँग्रेसचा किंवा खर्गे यांचा अपमान नसून,अशा प्रकारच्या कृतीमुळे समाजातील सर्वांचाच अपमान होतो,अशी भूमिका मांडल्याचेही वृत्त आहे.





घटनेमागील कारणावरूनही प्रश्नचिन्ह - दरम्यान,काही वृत्तांनुसार रामलीला मैदानाशी संबंधित संस्थेकडून मंचावर राजकीय कार्यक्रम घेण्याबाबत आक्षेप व्यक्त करण्यात आला होता आणि कार्यक्रमादरम्यान कथित आक्षेपार्ह घोषणा झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे हवनामागे नेमके कारण काय होते,याची स्वतंत्र चौकशी होणे महत्त्वाचे आहे.

हल्द्वानीतील या कथित ‘शुद्धीकरणा’ मुळे आता प्रश्न केवळ एका राजकीय सभेपुरता मर्यादित राहिलेला नाही. संविधानातील समानता, सामाजिक प्रतिष्ठा आणि अस्पृश्यतेविरोधातील मूल्यांवरून हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. चौकशीनंतर या घटनेमागील नेमके तथ्य काय आहे,हे स्पष्ट होणार आहे.