अनधिकृत पैशांच्या विल्हेवाटीत सहभागाचा आरोप; मुख्य आरोपी मनोर भोसलेचा शोध सुरू
सोलापूर : मनोर भोसले प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून,पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूट (शिक्षण संस्था) संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्यासह अन्य आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(2), 318(4),3 (5) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचा प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 3(2), 3(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच BNS कलम 111(2) (ब) इतर कलमांसह वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सदर गुन्हा २३ एप्रिल २०२६ रोजी दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात मुख्य आरोपी मनोर चंद्रकांत भोसले व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण ६ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी पोलिस अधिकारी व अंमलदारांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाने गुन्ह्यात सहभागी असलेल्या एकूण २४ आरोपींना निष्पन्न केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार,दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोर भोसले याच्याकडून प्राप्त झालेल्या कथित अनधिकृत पैशांच्या विल्हेवाटीत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना मदत करणारे संस्थेतील आरोपी राजेंद्र गोकुळ हंबे यांना ११ ऑगस्ट २०२६, तर लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना १३ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. या आरोपींची पोलिस कोठडी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मंजूर होती.
तपासादरम्यान रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना १६ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली.
आज तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.
दरम्यान,या गुन्ह्यातील आरोपी रामदास झोळ फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले आहे. त्याचा शोध सुरू असून,प्रकरणाचा पुढील तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये दिली आहे.
