विजापूर नाका पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
सोलापूर : विजापूर ते सोलापूर मार्गावर गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली असून,त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल,पाच जिवंत काडतुसे,दोन मोबाईल फोन व मोटारसायकल असा सुमारे ₹1 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पिस्तूल व काडतुसे पुरविणाऱ्या आणखी एका संशयितासही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,19 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार गायकवाड व पथकातील अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विजापूर ते सोलापूरकडे स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक KA28HF2336 वरून एक इसम प्रवास करीत असून त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह कारवाईसाठी रवाना होऊन नवीन विजापूर नाका परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे लोडेड गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी (वय 39,व्यवसाय-खाजगी नोकरी,रा.शांतेंश्वर गल्ली,इंडी ग्रामीण,ता.इंडी,जि.विजयपूर,कर्नाटक) असे असल्याचे नमूद केले आहे. पिस्तूल बाळगण्याबाबत त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात समोर आले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) अन्वये विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याला 19 ऑगस्ट रोजी पहाटे 5.20 वाजता अटक करण्यात आली.
पिस्तूल कोठून आणले? तपासातून दुसरा संशयित ताब्यात
मंजुनाथ याच्याकडून मिळालेल्या पिस्तूल व काडतुसांबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने सदर पिस्तूल व काडतुसे इंडी येथील त्याचा मित्र घनश्याम दल्लीचंद जाट याच्याकडून घेतल्याचे तपासात समोर आले.
यानंतर पोलिसांनी इंडी येथे जाऊन घनश्याम दल्लीचंद जाट (वय 27,व्यवसाय-आयस्क्रीम विक्री,रा.सातलियास मिलवाड, राजस्थान; सध्या बिरप्पा नगर,तांब्याच्या घरी भाड्याने,ता. इंडी,जि.विजयपूर,कर्नाटक) याला ताब्यात घेतले.
त्याच्याविरुद्धही पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
